नागपूर : मुलाकडून वृद्ध वडिलांना मारहाण, आई निश्चिंत; व्हिडिओ व्हायरल होऊन समाजात संताप

नागपूर : सामाजिक माध्यमांवर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. दोन मिनिटांच्या या व्हिडिओत एक तरुण आपल्या वृद्ध वडिलांना निर्दयीपणे मारहाण करताना दिसतो. विशेष म्हणजे, त्या वेळी त्याची आई शेजारी बसून निश्चिंतपणे मेंदी काढत आहे. ही घटना नागपूरमधील शांतीनगर परिसरातील असल्याचे उघड झाले असून, या प्रकरणाने समाजात संतापाची लाट उसळली आहे. व्हिडिओत मुलगा वडिलांना थोबाडीत मारणे, केस ओढणे आणि कान धरून अपमानित करणे असे प्रकार करताना दिसतो. ज्यांनी आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आयुष्यभर कष्ट केले, त्या पालकांवरच वृद्धापकाळात हात उगारला जातो, हे दृश्य समाजाच्या माणुसकीला काळिमा फासणारे आहे. या घटनेची माहिती मिळताच नागपूर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर वडिलांनी तक्रार देण्यास नकार दिला. “मला मारहाण झालीच नाही,” असे त्यांनी सांगितले, तर आईने, “हा आमचा कौटुंबिक विषय आहे,” असे उत्तर दिले. त्यामुळे पोलिसांचीही पंचाईत झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन तामटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मुलाला समज देत त्याला त्याच्या कृत्याची जाणीव करून दिली. हा व्हिडिओ कोणी आणि का शूट केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काहींच्या मते, मुलाला धडा शिकवण्यासाठीच तो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला.या घटनेमुळे कौटुंबिक प्रेम, विश्वास आणि नैतिक मूल्यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून, अशा घटनांवर समाजात तीव्र चर्चा सुरू आहे.