मुस्लिम तरुण आरिफ खान चिश्तीचा मोठा निर्णय – संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची इच्छा, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

नर्मदापुरम (मध्य प्रदेश) | नर्मदापुरम जिल्ह्यातील इटारसी येथील
आरिफ खान चिश्ती या तरुणाने संत प्रेमानंद महाराजांना आपली किडनी दान करण्याची
तयारी दर्शवली आहे. २० ऑगस्ट २०२५ रोजी लिहिलेल्या पत्रातून आरिफने आपली भावना
मांडली असून, समाजात या निर्णयाचे कौतुक होत आहे.
कोण आहे आरिफ खान चिश्ती?
इटारसीतील न्यासा कॉलनी येथे राहणारा आरिफ खान चिश्ती हा
बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला असून, तो ऑनलाइन नोकरी करतो. तो संत प्रेमानंद
महाराजांचे प्रवचन नियमितपणे ऐकतो आणि त्यांच्या साधेपणाने व विचारांनी प्रभावित झाला
आहे. आरिफच्या या निर्णयाला त्याच्या कुटुंबीयांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. पत्रातून
व्यक्त केलेल्या भावना आरिफने पत्रात लिहिले आहे की, “तुमचे
साधे आचरण आणि विचार पाहून मला खूप प्रेरणा मिळते. तुमच्या आरोग्याची मला काळजी
वाटते. सोशल मीडियावरून तुमच्या किडनीच्या समस्येबाबत माहिती मिळाली. तुम्ही
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे जिवंत प्रतीक आहात. म्हणूनच मी स्वेच्छेने माझी किडनी दान
करण्याचा निर्णय घेतला आहे. कृपया माझी ही छोटीशी भेट स्वीकारावी.” सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव आरिफच्या या निःस्वार्थ भावनेचे सोशल
मीडियावर मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. अनेकांनी त्याच्या कृतीला हिंदू-मुस्लिम
ऐक्याचे उत्तम उदाहरण मानले आहे. संत प्रेमानंद महाराजांचे अनुयायी तसेच सामान्य
नागरिकही या निर्णयामुळे प्रभावित झाले आहेत. ही घटना समाजात एकता, प्रेम आणि मानवी मूल्यांचे प्रतीक म्हणून बघितली जात आहे.