विवाहित तरुणी व प्रियकराचा खून – वडिलांकडून दोघांना विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे सोमवारी घडलेली दुहेरी हत्या संपूर्ण परिसराला हादरवून सोडणारी ठरली आहे. घटनेचा तपशील: उमरी तालुक्यातील बोरजुनी गावची संजीवनी कमळे हिचा विवाह गतवर्षी गोळेगाव येथील युवकासोबत झाला होता. मात्र लग्नानंतरही तिचे गावातीलच लखन भेंडारे याच्याशी प्रेमसंबंध कायम होते. या संबंधामुळे कुटुंबीय नाराज होते. सोमवारी संजीवनी आणि लखन हे गोळेगाव येथे आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. सासरच्या मंडळींनी त्यांना पकडले व माहेरी कळवले. त्यानंतर वडील मारुती सुरणे व नातेवाईकांनी दोघांना गावाकडे नेण्याचे सांगितले. परंतु मार्गात करकाळा शिवारात, संतापाच्या भरात वडील आणि नातेवाईकांनी तरुणीचे हातपाय बांधून तिला विहिरीत फेकले, तर प्रियकराला मारहाण करून त्याचा मृतदेह विहीरीजवळ टाकला.

 शोध मोहिमेनंतर :

  • रात्री उशिरा तरुणीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला
  • प्रियकराचा मृतदेह सकाळी थोड्या अंतरावर आढळला

या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस कारवाई:
घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील आणि उमरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने घटनास्थळी दाखल झाले. मुलीच्या वडिलांसह काही नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.