मुंबई जलमय; मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

मुंबई : काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण मुंबई जलमय झाली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत अजून मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई परिसरात पावसाचा जोर कायम आहे. रेल्वे वाहतूकही पावसामुळे विस्कळीत झाली असून मध्य रेल्वेच्या मेन लाईन, ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावरील गाड्या सरासरी २० मिनिटे उशिराने धावत आहेत. यामुळे चाकरमानी आणि सुट्टीसाठी आलेल्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली आहे. नवी मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचले असून, सायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी दिसत आहे. तुर्भे पोलीस ठाण्याच्या आवारात पाणी शिरल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना कामकाजात अडचणी येत आहेत. महापालिका प्रशासनाकडून पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, विक्रोळीतील पार्क साईट परिसरात जनकल्याण सोसायटी येथे पहाटे १ वाजता दरड कोसळली. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला असून दोन जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भाग पावसाळ्यात दरडग्रस्त ठरतात. स्थानिकांनी प्रशासनाकडे संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली आहे. सध्या प्रशासनाकडून पाणी उपसण्याचे आणि दरडग्रस्त भागात मदतकार्य सुरू आहे.