अंधेरीत लोकलसमोर तरुणाची आत्महत्या; भावेश शिंदेच्या मृत्यूने परिसरात खळबळ

मुंबई: मुंबईतील अंधेरी उपनगरात ३० वर्षीय भावेश शिंदे या तरुणाने सोमवारी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला. भावेशने लोकलसमोर झेप घेतली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

भावेश शिंदे कोण होता?

मिळालेल्या माहितीनुसार, मयत भावेश शिंदे हा जोगेश्वरी पूर्वमधील मोगरापाडा येथे राहत होता आणि जवळच असलेल्या एका मेडिकल स्टोअरमध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होता. तो रोजप्रमाणे सकाळी ७.३० वाजता घरातून बाहेर पडला होता.

मृतदेहाच्या चिंधड्या उडाल्या

सकाळी १० वाजताच्या दरम्यान भावेश रेल्वे रुळावर गेला आणि येणाऱ्या लोकलसमोर झेप घेतली. ट्रेन त्याच्या अंगावरून गेल्याने मृतदेहाचे तुकडे झाले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

 पोलिस तपास सुरू

अंधेरी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांनी सांगितले की, मृताच्या कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, मोबाइल फोन तपासणीसाठी जप्त करण्यात आला आहे. तसेच, भावेश ज्या मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता, त्या मालकाचे आणि मित्रांचेही जबाब घेतले जात आहेत.

 आत्महत्येपूर्वीचा इशारा

कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, आत्महत्येच्या एक दिवस आधी भावेश म्हणाला होता,

माझे शेवटचे दिवस जवळ आले आहेत, मला सर्व नातेवाईकांना भेटायचं आहे.” तो मेडिकल मालकाला देखील म्हणाला होता की, “२४ ऑक्टोबर हा माझ्या कामाचा शेवटचा दिवस असेल.” तथापि, कुटुंबियांनी त्याचे बोलणे गांभीर्याने घेतले नाही. प्राथमिक तपासात अचानक आलेल्या नैराश्यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.