मनसेचा कॅश बॉम्ब! सार्वजनिक बांधकाम खात्यातील भ्रष्टाचाराचा व्हिडिओ संदीप देशपांडेंनी केला उघड
मुंबई : हिवाळी अधिवेशनात उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी
पैशांच्या गड्ड्यांचा व्हिडिओ पोस्ट करून राज्यात खळबळ उडवली होती. त्यानंतर आता मनसेकडूनही
मोठा कॅश बॉम्ब टाकण्यात आला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्या
फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात सार्वजनिक बांधकाम खात्यातील (PWD) हाफकिन शाखेतील शाखा अभियंता कंत्राटदाराकडून पैसे घेताना स्पष्ट दिसत
आहे.
व्हिडिओत काय दिसते?
देशपांडे यांनी सांगितले की, हा व्हिडिओ लेटर ऑफ क्रेडिट (LOC) नावाखाली घेतल्या
जाणाऱ्या पैशांचा आहे. कंत्राटदाराने या टक्केवारीतील ₹2,80,000 रक्कम देतानाचे दृश्य त्यात कैद झाले आहे. देशपांडे म्हणतात, “ही रक्कम फक्त एका कंत्राटदाराकडून. पण अशा अनेकांकडून ही वसूली करण्यात
येते. निधी आणायचे पैसे वेगळे, वर्क ऑर्डरचे वेगळे आणि बिल
निघाल्यावरचे वेगळे पैसे मागितले जातात. हा उघडपणे सुरू असलेला भ्रष्टाचार आहे.” त्यांनी
पुढे माहिती दिली की, कार्यकारी अभियंत्यांचा हिस्सा वेगळा
असून, “उपअभियंत्यापासून सर्वांचे व्हिडिओ माझ्याकडे आहेत.”
बोली लावून बिले भागवली जातात
देशपांडे यांचा आरोप पुढे जातो. ते म्हणतात— “शासनाकडून १ कोटी निधी आला तर सर्वांची बिले फिट होत नाहीत. मग कंत्राटदार
स्वतः बोली लावतात—‘माझे बिल काढा, एवढी रक्कम देतो’. अनेक
कंत्राटदारांनी कामे न करता फक्त बिलाचे पैसे उचलले आहेत.”
त्यांच्या म्हणण्यानुसार,
- १० कंत्राटदारांची
मिळून ₹५
कोटींची बिले फिट केली गेली
- काम न केलेल्या
कंत्राटदारांची बोली सर्वाधिक
- शाखा अभियंता
वरीष्ठांपर्यंत विविधांचे “वाटे”
चौकशीची मागणी
देशपांडे यांनी प्रश्न उपस्थित केला की—
“निधी वाटपात कोण अधिकारी, कोण मंत्री,
कोण आमदार सहभागी आहेत? याची चौकशी झालीच
पाहिजे.”
मनसेचा इशारा
देशपांडे म्हणाले, “आज एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, उद्या दुसरा करतो, परवा तिसरा करतो.
जोपर्यंत शासन या भ्रष्टाचाराची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही हे
प्रकरण बाहेर काढत राहणार.” PWD विभागातील भ्रष्टाचारावर हा
सर्वात मोठा आरोप मानला जात असून, मनसेने सरकारला थेट आव्हान
दिले आहे.