सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला तरुण सापडला; CCTV फुटेजमुळे पोलिसांचा संशय गडद

सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेलेला २४ वर्षीय गौतम गायकवाड
हा तरुण पाच दिवसांपासून बेपत्ता होता. मित्रांनी दावा केला होता की तो तानाजी
कड्यावरून पाय घसरून दरीत पडला. मात्र, रविवारी (२४ ऑगस्ट) संध्याकाळी CCTV
फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध लावला. गौतम सापडला असून
त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संशयास्पद CCTV फुटेज
किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या CCTV फुटेजमध्ये एक तरुण पळताना आणि लपताना दिसल्याने प्रकरणाला वेगळंच वळण
मिळालं आहे. यामुळे गौतमने जाणीवपूर्वक बेपत्ता होण्याचा कट रचला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेचा तपशील
गौतम गायकवाड हा मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण येथील
रहिवासी आहे. तो बुधवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मित्रांसोबत
सिंहगड किल्ल्यावर गेला होता. त्याने लघुशंकेसाठी जातो असं सांगून काही अंतरावर
गेला, पण परतलाच नाही. बराच वेळ शोधल्यानंतरही तो न सापडल्याने मित्रांनी
पोलिसांना कळवले.
पोलिस आणि बचावकार्य
हवेली पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन वांगडे यांच्या
मार्गदर्शनाखाली पीएसआय दिलीप शिंदे यांच्या टीमने शोधमोहीम सुरू केली. हवेली
आपत्ती व्यवस्थापन पथक, मावळा जवान संघटना आणि वनविभागाचाही
शोधकार्यात सहभाग होता. अखेर पाच दिवसांच्या शोधानंतर रविवारी गौतमचा शोध लागला.