भुवनेश्वरमधील नाईटक्लबला भीषण आग; शेजारील फर्निचर दुकानाचाही झाला मोठा नुकसानी

गोव्यातील नाईटक्लबमधील भीषण अग्निकांडाला काही दिवसही झाले नसताना, आता भुवनेश्वरमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. भुवनेश्वरमधील सत्य विहार परिसरातील एका नाईटक्लबमध्ये शुक्रवारी दुपारी भीषण आग लागली. नाईटक्लबमधून काळ्या धुराचे मोठे लोट निघत असल्याचे दृश्य स्थानिकांनी पाहिले. आग कशामुळे लागली याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

आग शेजारच्या फर्निचर दुकानातही पसरली

लाकूड, स्पंज आणि ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग वेगाने पसरली आणि शेजारील फर्निचर दुकानालाही तिची झळ बसली. काही मिनिटांत संपूर्ण बाजारपेठेत धूर पसरल्याने दृश्यमानता कमी झाली. स्थानिक लोकांनी घाबरून दुकानं बंद केली.

अग्निशमन दलाची तातडीची धाव

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचल्या. दलाने तातडीने मदतकार्य सुरू केले आणि आग इतर दुकानदारांच्या तसेच निवासी घरांपर्यंत पोहोचू नये यासाठी मोठे प्रयत्न केले. सुदैवाने, आतापर्यंत कोणत्याही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.

गोवा दुर्घटनेनंतर पुन्हा एक आगीची घटना

गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन नाईटक्लबमध्ये लागलेल्या आगीत २५ जण मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेनंतर, ही दुसरी गंभीर आग लागण्याची घटना आहे. या पार्श्वभूमीवर, ओडिशा अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (OFES) विभागाने राज्यातील 100 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेल्या सर्व रेस्टॉरंट्स, बार आणि स्वतंत्र व्यावसायिक आस्थापनांचे राज्यव्यापी अग्निसुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत.