विवाहितेची आत्महत्या; १४ महिन्याच्या मुलाला विष पाजून घेतला गळफास
बार्शी (जि. सोलापूर): बार्शी
शहर पुन्हा एकदा हादरले आहे. २५ वर्षीय विवाहित अंकिता वैभव उकिरडे हिने तिच्या १४
महिन्यांच्या चिमुकल्याला विष पाजून घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही
धक्कादायक घटना शुक्रवारी (७ नोव्हेंबर) सकाळी उघडकीस आली. या घटनेत १४ महिन्याचा
मुलगा अन्वीक वैभव उकिरडे गंभीर अवस्थेत असून, त्याच्यावर सोलापूर येथे उपचार सुरू
आहेत. अंकिता उकिरडे हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अंकिताचे लग्न चार वर्षांपूर्वी
वैभव विकास उकिरडे यांच्याशी झाले होते. घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य बाहेर
गेले होते आणि अंकिता ही चिमुकल्यासह एकटीच होती. सकाळी नेहमीप्रमाणे घरकामासाठी
आलेल्या महिलेला घरात कोणी दिसले नाही, म्हणून तिने खिडकीतून
पाहिले असता, अंकिता ही सिलिंग फॅनला गळफास घेतलेली दिसली,
तर लहानगा अन्वीक बेशुद्ध अवस्थेत होता. घरकाम करणाऱ्या महिलेच्या
आरडाओरडीनंतर शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती
देण्यात आली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी बार्शी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात
आला. पोलिस आत्महत्येच्या कारणाचा तपास करत आहेत. दरम्यान, काही
दिवसांपूर्वीच बार्शीतच विवाहितेची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याची घटना ताजी
आहे. पूनम निरफल या महिलेची ओढणीने गळा आवळून आणि धारदार शस्त्राने १७ वार करून
हत्या करण्यात आली होती. आरोपी केतन जैन याने पूर्वीपासून असलेल्या संबंधातून या
घटनेचा अंत घडवला होता. या दोन्ही घटना बार्शीत चिंतेचा विषय ठरत आहेत.