गडचिरोलीने माओवाद संपवण्याची सुरुवात केली, भूपतीसह ६० माओवादींचं आत्मसमर्पण — मुख्यमंत्री फडणवीस

गडचिरोली (महाराष्ट्र): राज्यातील माओवादविरोधी लढाईत आज ऐतिहासिक पाऊल उचलले गेले. दंडकारण्यातील जहाल नक्षलवादी नेता मल्लोजुला वेणुगोपाल ऊर्फ भूपती (सोनू) यांनी अखेर गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या वेळी भूपती यांच्यासह तब्बल ६० माओवादी सदस्यांनी शस्त्रे खाली ठेवून संविधान हाती घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. त्यांनी सांगितले की, “माओवाद संपूर्णपणे संपवण्याची सुरुवात गडचिरोलीने केली आहे. भूपतीचे आत्मसमर्पण हे माओवादी चळवळीच्या समाप्तीचे निर्णायक पाऊल आहे.”

 भूपतीचा आत्मसमर्पण — अनेक अर्थाने ऐतिहासिक

भूपती गेली अनेक वर्षे महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती भागातील माओवादी चळवळीचा मुख्य चेहरा होता. त्याच्या शिरावर १० कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. तो महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, आणि ओडिशा राज्यात मोस्ट वॉन्टेड म्हणून घोषित होता. याआधी जानेवारी २०२५ मध्ये त्याची पत्नी विमला सिडाम ऊर्फ तारक्का, केंद्रीय समिती सदस्य, यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले होते.

यानंतर अनेक जहाल नक्षलवाद्यांनी शस्त्रं सोडून संविधान स्वीकारलं.

 मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य:

गेल्या दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माओवाद नष्ट करण्यासाठी ठोस योजना आखली. माओवादी विचारसरणीचा पराभव झाला आहे. आता देशातून माओवाद पूर्णपणे हद्दपार होईल.” फडणवीस म्हणाले की, माओवादी नेत्यांसमोर आता फक्त दोनच पर्याय उरले आहेत.   शस्त्रं खाली ठेवून मुख्य प्रवाहात सहभागी होणे  अन्यथा पोलीस कारवाईला सामोरे जाणे

 विकास आणि शांतीचा नवा अध्याय

पूर्वी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा हे नक्षलग्रस्त भाग होते. पण आज, गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर विकासकामे, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि पोलिसांचा विश्वास निर्माण झाला आहे. पूर्वी गडचिरोलीला बदली म्हणजे शिक्षा मानली जायची. आता पोलीस स्वतःहून गडचिरोलीला बदली मागतात. हा बदल महाराष्ट्राच्या सामूहिक प्रयत्नांचा परिणाम आहे.” — फडणवीस

 भूपतीचा आत्मसमर्पणाचा संदेश:

भूपती म्हणाला की, “शस्त्रसंग्रामाचा मार्ग चुकीचा होता. संविधानिक मार्गच देशाच्या प्रगतीसाठी योग्य आहे.” त्याने सांगितले की, माओवादी चळवळीने दाखवलेली स्वप्ने पूर्ण होऊ शकत नाहीत. त्यामुळेच त्याने आणि सहकाऱ्यांनी मुख्य प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला.