मध्य प्रदेशातील ‘कोल्ड्रिफ’ विषारी कफ सिरपकांडात मोठी कारवाई — कंपनी मालक रंगनाथन गोविंदन अटक; २० मुलांचा मृत्यू

भोपाळ / चेन्नई :- मध्य प्रदेशात विषारी कफ सिरप ‘कोल्ड्रिफ’ प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू झालेल्या प्रकरणात अखेर मोठी कारवाई करण्यात आली आहे.
राज्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) ‘श्रीसन फार्मा’ कंपनीचा मालक रंगनाथन गोविंदन याला चेन्नईतून अटक केली आहे.
तो गेल्या काही आठवड्यांपासून फरार होता.

बक्षीस जाहीर, नंतर अटक
रंगनाथनच्या अटकेसाठी पोलिसांनी २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
तो पत्नीसमवेत चेन्नईतील घर आणि कांचीपुरम कारखान्यावर कुलूप ठोकून फरार झाला होता.
काल रात्री उशिरा SIT टीमने इलेक्ट्रॉनिक ट्रॅकिंग आणि स्थानिक माहितीच्या आधारे त्याला चेन्नईतील एका अपार्टमेंटमधून पकडलं.

गुन्हा नोंद — डॉ. प्रवीण सोनी यांना आधीच अटक
५ ऑक्टोबर रोजी छिंदवाडा येथील पारसिया पोलिस ठाण्यात कंपनीचे संचालक,
बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी, आणि इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध
BNS कलम १०५, २७६ आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा १९४० कलम २७(A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
डॉ. सोनी यांना अटक झाली होती, मात्र कंपनी मालकाची अटक आजपर्यंत प्रलंबित होती.

चौकशी केंद्रबिंदू — घातक रसायन सिरपमध्ये कसं आलं?
SIT टीम रंगनाथनला भोपाळला आणणार आहे, जिथे
सिरपच्या उत्पादन प्रक्रियेत झालेल्या त्रुटी, कच्च्या मालाचा पुरवठा, परवाना अनियमितता आणि गुणवत्ता तपासणीतील दुर्लक्ष याबाबत चौकशी होणार आहे.
सिरपमध्ये घातक रसायन कसे समाविष्ट झाले, आणि गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेत एवढं गंभीर अपयश कसं झालं, याचा तपास सुरू आहे.

राज्यात संताप आणि घबराट
कोल्ड्रिफ’ सिरपमुळे २० मुलांचा मृत्यू झाल्यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ या औषधाच्या विक्रीवर बंदी घातली.
कंपनीविरुद्ध FIR दाखल करून चौकशी सुरू केली गेली असून, औषधांच्या सुरक्षिततेच्या मानकांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.