महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती लेखी परीक्षेसाठी ओएमआर प्रणालीचा वापर

महाराष्ट्र पोलीस दलातील शिपायांची सुमारे १५ हजार पदे
भरण्यात येणार आहेत. त्याकरिता आज सन २०२४-२५ च्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेस आज
झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या भरतीमध्ये सन २०२२ व सन २०२३ मध्ये संबंधित
पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज
करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. राज्याच्या पोलीस दलात
सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी, पोलीस शिपाई – १० हजार ९०८,
पोलीस शिपाई चालक – २३४, बॅण्डस् मॅन – २५,
सशस्त्री पोलीस शिपाई – २ हजार ३९३, कारागृह
शिपाई – ५५४. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस
शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर
(OMR) आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल. भरतीसाठी अर्ज
मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर
प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारिरीक परीक्षा, त्यातून पात्र
उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार
प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यासही बैठकीत
मान्यता देण्यात आली. राज्यातील कायदा व
सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत.
पदे रिक्त राहिल्यास, पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस
दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च
न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत.
लोकप्रतिनिधी, तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून
ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात आली आहे.