लिओनेल मेस्सीची मुंबई भेट, सचिन तेंडुलकर आणि सुनील छेत्रींसोबत ऐतिहासिक भेट

अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी सध्या भारत दौऱ्यावर असून, दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने देशाची आर्थिक राजधानी मुंबईला भेट दिली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लिओनेल मेस्सी यांच्या हस्ते ‘प्रोजेक्ट महादेव’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी क्रीडाप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. या कार्यक्रमाचा सर्वात खास क्षण म्हणजे क्रिकेट आणि फुटबॉल विश्वातील दिग्गजांचा एकत्र येणारा ऐतिहासिक क्षण. लिओनेल मेस्सीची ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर आणि भारतीय फुटबॉलचा आधारस्तंभ सुनील छेत्री यांच्यासोबत भेट झाली. मेस्सी, सचिन आणि छेत्री हे तिन्ही महान खेळाडू एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित चाहत्यांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला. या भेटीदरम्यान सचिन तेंडुलकरने लिओनेल मेस्सीला २०११ च्या विश्वचषक विजेत्या टीम इंडियाची जर्सी भेट दिली, ज्यावर सचिनची स्वाक्षरी होती. त्याच्या प्रत्युत्तरादाखल मेस्सीने सचिन तेंडुलकरला फुटबॉल भेट दिला. दोन्ही दिग्गजांनी एकत्र छायाचित्रे काढत परस्पर सन्मान आणि क्रीडाभावनेचे दर्शन घडवले. कार्यक्रमादरम्यान मेस्सीने आपल्या सहकारी रोड्रिगो डी पॉल आणि लुईस सुआरेझ यांच्यासह लहान मुलांसोबत ‘रोंडो’ खेळाचा आनंद घेतला. मैदानावरील हा सहज संवाद आणि मुलांना खेळाचे बारकावे शिकवताना पाहून उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. मेस्सीच्या भारत दौऱ्याची सुरुवात कोलकात्यातून झाली होती. कोलकात्यातील कार्यक्रमात काही प्रमाणात गोंधळ झाला असला, तरी हैदराबादचा टप्पा यशस्वी ठरला. मुंबईतील ऐतिहासिक कार्यक्रमानंतर आता लिओनेल मेस्सी आपल्या भारत दौऱ्याच्या पुढील टप्प्यासाठी नवी दिल्लीत जाणार आहेत.