उत्तराखंडमध्ये दरड कोसळली – भाजप खासदार अनिल बलुनी थोडक्यात बचावले, व्हिडीओ शेअर करत व्यक्त केला वेदना"

देहरादून | १८ सप्टेंबर २०२५
उत्तराखंडमध्ये ढगफुटी, भूस्खलन आणि पूर यामुळे निसर्गाचा प्रकोप सुरूच आहे. बुधवारी संध्याकाळी बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड दरड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेच्या वेळी भाजपचे गढवालचे खासदार आणि पक्षाचे मीडिया प्रमुख अनिल बलुनी हे घटनास्थळी उपस्थित होते. 
खासदार बलुनी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन परतत असताना ही घटना घडली. त्यांनी मागे असलेल्या वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. त्याच क्षणी आणखी एक दरड कोसळली, ज्यामुळे बलुनींनाही जीव वाचवण्यासाठी धावावे लागले.

घटनेतील महत्वाचे मुद्दे

  • घटना देवप्रयागजवळील बद्रीनाथ महामार्गावर घडली.
  • प्रसंगावधानाने वाहने थांबवली गेल्याने मोठी जीवितहानी टळली.
  • बलुनींनी स्वतःचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून परिस्थितीचे वर्णन केले.

अनिल बलुनी यांची प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत बलुनी म्हणाले, उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी आणि भूस्खलनांमुळे खूप मोठ्या जखमा झाल्या आहेत. या जखमा भरायला वेळ लागेल. बाबा केदारनाथांकडे सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो.” ते पुढे म्हणाले की, संकटाच्या काळात एनडीआरएफ, एसडीआरएफ, प्रशासन आणि कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून दिलेली सेवा कौतुकास्पद आहे.