कुलगाम, जम्मू-काश्मीर : ‘ऑपरेशन अखल’चा नववा दिवस, दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर परिसरात सलग नवव्या दिवशी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ऑपरेशन अखल दरम्यान झालेल्या गोळीबारात दोन भारतीय जवान शहीद झाले असून, आणखी दोन जवान जखमी झाले आहेत.

चिनार कॉर्प्सने शहीद L/Nk प्रितपाल सिंग आणि हरमिंदर सिंग यांच्या बलिदानाला सलाम करत त्यांच्या धैर्याला आणि समर्पणाला श्रद्धांजली वाहिली.

ही कारवाई १ ऑगस्टपासून सुरू असून, आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. त्यांची ओळख आणि ते कोणत्या गटाशी संबंधित आहेत, याची पुष्टी अद्याप झालेली नाही.

 

लष्कर, जम्मू-काश्मीर पोलिस आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने जंगल परिसरात घेराबंदी केली आहे. अतिरिक्त सैन्य, ड्रोन, हेलिकॉप्टर आणि पॅरा कमांडो तैनात करून शोधमोहीम सुरू आहे.

 

जम्मू-काश्मीरचे पोलिस प्रमुख नलिन प्रभात आणि नॉर्दन आर्मी कमांडर ले. जनरल प्रतीक शर्मा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

घनदाट जंगलात अजूनही काही दहशतवादी लपून बसल्याचा अंदाज असल्याने ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले आहे.