ठाण्यातील ‘संस्कृतीची दहीहंडी’त कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने रचले 10 थर; विश्वविक्रमाची नोंद, 25 लाख पारितोषिक जाहीर

ठाणे : प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची दहीहंडी उत्सवात 2025 मधील पहिला मोठा विक्रम प्रस्थापित झाला आहे. कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाने 10 थरांची दहीहंडी रचून विश्वविक्रमाची नोंद केली आहे. याआधी याच मंचावर 9 थरांचा विक्रम घडला होता. नव्या उंचीचा हा विक्रम सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण ठरला असून, विजेत्या पथकाला तब्बल 25 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. 9 थरांवरून 10 थरांपर्यंतचा प्रवास गोकुळाष्टमी निमित्त झालेल्या या विक्रमामुळे ठाण्यातील उत्सवाला जागतिक पातळीवर वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. 9 थरांचा विक्रम ओलांडत कोकण नगरच्या खेळाडूंनी मेहनत, जिद्द आणि शिस्त यांच्या जोरावर इतिहास रचला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे. 10 थरांचा विक्रम ही केवळ ठाण्याची नव्हे, तर संपूर्ण देशाची शान आहे. खेळाडूंनी आपल्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत जगभरात ठसा उमटवला आहे. आजचा क्षण हा अत्यंत गौरवाचा आहे,” असे सरनाईक यांनी सांगितले. युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांचे मत आमच्या मंचावर यापूर्वी 9 थरांचा विक्रम झाला होता. आज कोकण नगर पथकाने 10 थरांची नवी उंची गाठली आहे. मेहनत, जिद्द आणि शिस्त यांच्या बळावर महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकवला आहे. माझा विश्वास सार्थ ठरला,” असे ते म्हणाले.