पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करून त्याचा खून करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी इंडी तालुक्यातील होर्ती येथून चौघांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आमदार पडळकर यांचा कार्यकर्ता शरणु शिवराय हांडे (वय ३६, रा.  साई नगर, अक्कलकोट रोड) याचे राज बिअर शॉपीच्यामागे, समाधान नगर रोड येथुन ५ ते ६ इसमांनी पांढ-या रंगाच्या चारचाकी वाहनातून अपहरण केले. याची तक्रार त्यांचा भाऊ विष्णु शिवराय हांडे यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन हजर असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडून घटनेची माहिती घेतली. त्यांनी अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचे वर्णन व आरोपींचे वर्णन यांची माहिती दिली. त्याअनुषंगाने पोलिसांच्या ४ टिम तयार करण्यात आल्या. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी तसेच तांत्रिक तपास करून वाहन कोणत्या दिशेने गेले याबाबतचा तपास करण्यात आला. सदर वाहनाचा पाठलाग करून वाहनामधून अपहरण झालेल्या  शरणु हांडे व अपहणकर्ते  अमित म्हाळप्पा सुरवसे (वय २९, रा. मणिधारी सोसायटी, अक्कलकोट रोड)सुनिल भिमाशंकर पुजारी (वय २०, रा. साईबाबा चौक), दिपक जयराम मेश्राम (वय २३, रा. लोकमंगल हॉस्पिटल जवळ, आशा नगर), अभिषेक गणेश माने (वय २३, रा. एकता नगर) यांना ताब्यात घेतले. तसेच अपहरणासाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची कार कार (MH12XX6547) होर्ती गावाजवळील विजयपूर ते सोलापूरकडे येणाऱ्या हायवेचे उड्डाणपुलाजवळून ताब्यात घेण्यात आले आहे. जखमी झालेल्या शरणू हांडे यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपहरणकर्त्यांकडून कोयता, हत्यारे व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदरची घटना ही पूर्ववैमन्यासातून झाली आहे. सदरची कारवाई ही एमआयडीसी पोलीस ठाणे, सोलापूर शहरकडील गुन्हे प्रकटीकरण पथक व गुन्हे शाखेकडील पोलीसांनी अवघ्या ४ तासात पूर्ण करून अपहरण झालेल्या इसमाचे प्राण वाचविण्यात आले आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर, प्रमोद वाघमारे, सुनील दोरगे, विजय खोमणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भरत चंदनशिव, शंकर धायगुडे फौजदार महेंद्र गाढवे, सचिन भांगे, मंगेश गायकवाड, शैलेश स्वामी, अमोल यादव आदींनी केली आहे.

 

शरणू हांडेची पडळकरांकडून

सिव्हिलमध्ये केली चौकशी

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी सकाळी शासकीय रुग्णालयात शरणू हांडे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. त्यानंतर तेथील डॉक्टरांशी भेट घेऊन त्यांनी सूचना दिल्या आहेत.