कनेरी स्वामींना विजयपूर जिल्ह्यात प्रवेशास जिल्हा प्रशासनाकडून बंदी

विजयपूर :- अलीकडे एका कार्यक्रमात कनेरी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी बसव संस्कृती अभियान आणि लिंगायत मठाधीशांबद्दल  अपमानास्पद व धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले होते. त्यामुळे  तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, निषेध आंदोलन सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून स्वामीजींना  14 डिसेंबर पर्यंत, म्हणजे दोन महिने विजयपूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.

   महाराष्ट्रातील जत तालुक्यातील बीळूर येथे अलीकडेच पार पडलेल्या एका कार्यक्रमात अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी लिंगायत मठाधीशांच्या संघटनेद्वारे राज्यात राबवण्यात येणाऱ्या बसव संस्कृती अभियानावर आणि या अभियानाचे नेतृत्व करणाऱ्या मठाधीशांवर अवमानकारक आणि अपशब्द वापरले होते. यामुळे विजयपूर, बसवकल्याण, कूडलसंगम, बेळगाव, दावणगेरे, बीदर, गदग आदी भागांमध्ये स्वामीजींविरोधात निषेध नोंदवण्यात आला.

या पार्श्वभूमीवर, बसवनबागेवाडीमध्ये समर्थ सद्गुरु सिद्धरामेश्वर महाराज यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्वामीजी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमात गोंधळ होण्याची आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिस खात्याच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी *डॉ. आनंद के. यांनी कन्हेरी स्वामीजींना डिसेंबर 14 पर्यंत बसवनबागेवाडी आणि विजयपूर जिल्ह्यात प्रवेशास बंदी घालणारा आदेश  जारी केला आहे.