तुळजाभवानी मंदिराचा गाभारा पाडण्याला जितेंद्र आव्हाडांचा तीव्र विरोध; “औरंगजेबालाही जमलं नाही ते सरकार करतंय”

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या
तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिराचा गाभारा पाडून नवीन बांधकाम करण्याच्या
सरकारच्या निर्णयाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड
यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. १२ ऑगस्ट रोजी सकाळी तुळजापूरकडे रवाना होताना
माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले, "मंदिर जमीनदोस्त करून तिथे नवीन
मंदिर बांधण्याचा घाट घालण्यात येतो आहे. या गाभाऱ्यातून छत्रपती शिवाजी
महाराजांनी आई भवानीचा आशीर्वाद घेऊन स्वराज्याची स्थापना केली. जे औरंगजेबाला आणि
अफजल खानाला जमले नाही ते काम आजचे सरकार करत आहे." आव्हाड यांनी प्राचीन
मंदिर तोडण्याच्या निर्णयाला आक्षेप घेत, गावकरी आणि
भक्तांना विश्वासात घेण्याची मागणी केली. त्यांनी स्पष्ट केले की, प्राचीन वास्तूंचे जगभर जतन केले जाते, परंतु
महाराष्ट्रात प्राचीन मंदिर तोडण्याचा प्रयत्न होतो आहे. "माझी आई
तुळजाभवानीवर अपार श्रद्धा आहे. मी हिंदू धर्माची पाठराखण करणारा आहे. मला कोणी
हिंदू धर्म शिकवू नये," असा इशारा त्यांनी दिला. आव्हाड
यांच्या मते, मंदिराचा कळस पाडण्याचा निर्णय हा भाविकांच्या
भावना दुखावणारा आहे आणि देशभरातील भक्तांनी याला विरोध करावा.