अजित पवार यांच्या धाकट्या लेका जय पवार यांचा विवाहसोहळा बहरीनमध्ये; फक्त ४०० पाहुण्यांची उपस्थिती, शरद पवारांसह संपूर्ण कुटुंब हजेरी
मुंबईतील बीकेसी येथील जिओ सेंटरमध्ये ३० नोव्हेंबर रोजी
युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा राजेशाही थाटात विवाहसोहळा पार पडला.
पवार कुटुंब या समारंभासाठी एकत्र आले होते. राजकीय क्षेत्रापासून मनोरंजन व
उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदांपत्याला आशीर्वाद दिले.
यानंतर आता पवार कुटुंबात आणखी एक लगीनघाई सुरू झाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या धाकट्या लेका जय पवार यांचा विवाहसोहळा ५ डिसेंबर रोजी बहरीन येथे पार पडणार आहे. हा लग्नसोहळा महाराष्ट्रात न होताच परदेशात आयोजित करण्यात आला आहे, यामुळे या विवाहाची विशेष चर्चा आहे. या विवाहासाठी जवळच्या केवळ ४०० पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. पवार–पाटील कुटुंबातील हा सोहळा बहरीनमधील आलिशान ठिकाणी पार पडणार असून सर्व कार्यक्रमांसाठी स्वतंत्र ड्रेस कोड ठेवल्याची माहिती मिळते.
विवाहसोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
- ४ डिसेंबर: मेहंदी
- ५ डिसेंबर: हळद, वरात
आणि मुख्य लग्नसोहळा
- ६ डिसेंबर: संगीत
- ७ डिसेंबर: स्वागत समारंभ
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या विवाहसोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून लग्नपत्रिका आणि बहरीनमधील कार्यक्रमस्थळाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी जय पवार यांनी होणाऱ्या पत्नीसह शरद पवार यांचे आशीर्वाद घेतलेले फोटो शेअर केले होते. त्यामुळे या लग्नाला शरद पवार, सुप्रिया सुळे, तसेच पवार कुटुंबातील सर्वजण उपस्थित राहणार हे निश्चित झाले आहे. राजकीय घराण्याच्या या भव्य आणि आकर्षक विवाहसोहळ्याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.