जेडेन सील्सचा ऐतिहासिक पराक्रम – पाकिस्तानविरुद्ध 6 विकेट्स घेणारा पहिला वेस्टइंडीज गोलंदाज

तरुबा, ब्रायन लारा स्टेडियम – वेस्टइंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील अंतिम सामन्यात वेस्टइंडिजचा वेगवान गोलंदाज जेडेन सील्सने ऐतिहासिक गोलंदाजी करत विक्रम रचला. सील्सने केवळ 7.2 षटकांत 18 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानविरुद्ध एका एकदिवसीय सामन्यात 6 बळी घेणारा तो वेस्टइंडिजचा पहिला गोलंदाज ठरला. या सामन्यात सील्सने सुरुवातीलाच पाकिस्तानच्या फलंदाजीचा कणा मोडला. त्याने सॅम अयूब (0), अब्दुल्ला शफीक (0) आणि मोहम्मद रिझवान (0) यांना स्वस्तात बाद केले. त्यानंतर कर्णधार बाबर आझम (9), नसीम शाह (कॅच अँड बोल्ड) आणि हसन अली (0) यांना बाद करून त्याने सहा विकेट्स पूर्ण केल्या. या कामगिरीने त्याने वेस्टइंडिजच्या फ्रँकलिन रोज यांचा 25 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ज्यांनी 10 षटकांत 23 धावांत 5 विकेट्स घेतल्या होत्या. वेस्टइंडिजच्या एकदिवसीय क्रिकेटमधील ही तिसरी सर्वोत्तम गोलंदाजी आहे. यापूर्वी विंस्टन डेव्हिस (7/51, 1983 ऑस्ट्रेलियाविरुद्ध) आणि कॉलिन क्रॉफ्ट (6/15, 1981 इंग्लंडविरुद्ध) यांनी अव्वल स्थान मिळवले होते. जेडेन सील्सच्या या कामगिरीने वेस्टइंडिजच्या नव्या पिढीतील गोलंदाजीतील ताकद अधोरेखित केली. त्याच्या या विक्रमी प्रदर्शनामुळे वेस्टइंडिजने सामना जिंकत मालिकेत वर्चस्व प्रस्थापित केले.