IPL 2026 मिनी ऑक्शन: विदेशी खेळाडूंना 18 कोटींची मर्यादा, मोठ्या बोलीवरही नियम लागू
आयपीएल 2026 च्या हंगामासाठीचा मिनी लिलाव आज (16
डिसेंबर) अबू धाबीत पार पडत आहे. या मिनी ऑक्शनपूर्वी कोणत्या
खेळाडूवर किती मोठी बोली लागणार आणि जुने विक्रम मोडले जाणार का, याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र यंदाच्या लिलावात एका महत्त्वाच्या
नियमामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या
नियमानुसार, मिनी ऑक्शनमध्ये कोणताही विदेशी खेळाडू 18
कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करू शकत नाही. फ्रँचायझीने जरी
त्याच्यावर अधिक रक्कमेची बोली लावली तरी खेळाडूला मिळणारी सॅलरी ही केवळ 18
कोटी रुपयेच असेल. उरलेली रक्कम बीसीसीआयच्या वेलफेअर फंडात जमा
होणार आहे. हा नियम आर्थिक शिस्त राखण्यासाठी लागू करण्यात आला असून, IPL
2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये पहिल्यांदा तो अंमलात आणण्यात आला होता.
यंदाच्या मिनी लिलावातही तोच नियम लागू राहणार आहे. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनला जर 30 कोटी रुपयांची बोली लागली, तरी त्याला प्रत्यक्षात 18
कोटी रुपयेच मिळतील, तर उरलेले 12 कोटी रुपये बीसीसीआयकडे जातील.
यंदाच्या मिनी ऑक्शनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडे
सर्वाधिक 64.3 कोटी रुपयांची पर्स शिल्लक आहे,
तर चेन्नई सुपर किंग्जकडे 43.6 कोटी रुपये
उपलब्ध आहेत. त्यामुळे या दोन संघांचा लिलावात दबदबा राहण्याची शक्यता आहे. मात्र,
नियमामुळे कोणत्याही विदेशी खेळाडूला 18 कोटींच्या
वर रक्कम मिळणार नाही. विशेष म्हणजे हा नियम फक्त परदेशी खेळाडूंनाच लागू आहे.
भारतीय खेळाडूंना मात्र ज्या रकमेची बोली लागेल ती पूर्ण रक्कम मिळणार आहे. IPL
2025 च्या मेगा लिलावात ऋषभ पंतवर 27 कोटी
रुपयांची विक्रमी बोली लागली होती आणि त्याला पूर्ण सॅलरी मिळाली होती. आता IPL
2026 मिनी ऑक्शनमध्ये कोणता भारतीय खेळाडू नवा विक्रम करतो का,
याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.