IPL 2026 इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाड़ू ठरला कॅमरून ग्रीन

IPL 2026 स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमीरातमधील अबू धाबी येथे पार पडलेल्या मिनी लिलावात ऑस्ट्रेलियन ऑलराउंडर कॅमरून ग्रीनवर विक्रमी बोली लागली. 2 कोटी रुपये बेस प्राइज असलेल्या या खेळाडूसाठी मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळाली. सर्वात कमी पर्स असतानाही मुंबई इंडियन्सने सुरुवातीची बोली लावली. मात्र अखेरीस सर्वाधिक पर्स असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने 25 कोटी 20 लाख रुपयांची बोली लावत कॅमरून ग्रीनला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. या विक्रमी रकमेसह ग्रीन IPL इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. याआधी हा विक्रम मिचेल स्टार्कच्या (24.75 कोटी रुपये) नावावर होता. BCCI च्या नव्या नियमानुसार परदेशी खेळाडूंना जास्तीत जास्त 18 कोटी रुपयेच पगार मिळू शकतो. त्यामुळे ग्रीनला प्रत्यक्षात 18 कोटी रुपये मिळतील, तर उर्वरित रक्कम BCCI च्या वेलफेअर अकाउंटमध्ये जमा होणार आहे. कॅमरून ग्रीनने 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून IPL पदार्पण केले होते. त्यानंतर 2024 मध्ये तो RCB कडून खेळताना दिसला. आतापर्यंत 29 IPL सामन्यांत त्याने 707 धावा केल्या असून, एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद 100 धावा ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.