धुक्यामुळे भारत–दक्षिण आफ्रिका चौथा टी-२० सामना रद्द; क्रिकेट इतिहासातील पहिलीच घटना
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या
टी-२० मालिकेतील चौथा सामना बुधवारी लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार
होता. मात्र, मैदानावर पसरलेल्या दाट धुक्यामुळे सामना
सुरू होऊ शकला नाही आणि अखेर पंचांनी ऐतिहासिक निर्णय घेत हा सामना अधिकृतपणे रद्द
केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात पावसाव्यतिरिक्त केवळ धुक्यामुळे सामना
रद्द होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. सामना संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार होता,
तर नाणेफेक ६:३० वाजता नियोजित होती. मात्र, धुक्यामुळे
दृश्यमानता अत्यंत कमी असल्याने पंचांनी सलग पाच वेळा मैदानाची पाहणी केली. ६:५०,
७:३०, ८:००, ८:३० आणि
९:०० वाजता निरीक्षण करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने रात्री ९:२५ वाजता
सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, लखनऊमधील
वाढते प्रदूषणही चिंतेचा विषय ठरले. शहराचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (AQI)
४०० च्या वर पोहोचल्याने आरोग्यासाठी धोकादायक परिस्थिती निर्माण
झाली होती. मैदानावर सराव करताना आणि डगआऊटमध्ये अनेक खेळाडू मास्क घालून बसलेले
दिसले. खेळाडूंच्या सुरक्षिततेचा विचार करता सामना रद्द करणे योग्य असल्याचे मत
तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.