भारत-अमेरिका ट्रेड डीलवरील चर्चा अंतिम टप्प्यात; पियूष गोयल यांचा मोठा खुलासा
भारत आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेलं ट्रेड डील आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे, असा सुतोवाच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की, दोन्ही देशांमधील चर्चा सध्या जलद गतीने सुरू असून, भारताची एक उच्चस्तरीय टीम अमेरिकेत चर्चेसाठी पोहोचली आहे. गोयल म्हणाले, “भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारावर सतत बैठकांद्वारे प्रगती होत आहे. आमची टीम वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन समकक्षांसोबत चर्चा करत आहे. १७ ऑक्टोबर रोजी भारतीय शिष्टमंडळ पुन्हा अमेरिकेला जाणार आहे, ज्यामध्ये या चर्चेला अंतिम रूप दिलं जाणार आहे.” त्यांनी पुढे सांगितलं की, भारताने गेल्या तीन वर्षांत अनेक विकसित देशांसोबत मुक्त व्यापार करार (FTA) केले आहेत. “आम्ही अमेरिका, युरोपियन युनियन, चिली, पेरू, न्यूझीलंड आणि ओमानसोबत देखील व्यापार कराराबाबत चर्चा करत आहोत,” असं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, भारताचे व्यापार सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील टीम सध्या अमेरिकेत सतत बैठक घेत आहे. व्यापार सचिवांनी सांगितले की, अमेरिकेसोबत भारताची उर्जा खरेदी २२ ते २३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे, आणि यात आणखी १२ ते १३ अब्ज डॉलरची वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्वी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर या चर्चेवर विराम लागला होता. मात्र आता पुन्हा चर्चेला वेग आला असून, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये या चर्चेचा पहिला टप्पा पूर्ण होणार आहे. याशिवाय, पियूष गोयल यांनी ब्राझीलसोबतच्या व्यापार चर्चेचाही उल्लेख केला. “लवकरच दक्षिण अमेरिकेच्या बाजारपेठेत भारताची एन्ट्री सोपी होईल,” असं त्यांनी सांगितलं.