भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय! दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी हरवत पहिल्यांदाच विश्वविजेतेपद
नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने अखेर ५२ वर्षांचा
विश्वचषक विजयाचा दुष्काळ संपवला आहे. रविवारी डी.वाय. पाटील स्टेडियमवर
खेळल्या गेलेल्या महिला विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण
आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करत पहिल्यांदाच आयसीसी एकदिवसीय विश्वविजेतेपद
पटकावले. भारताने प्रथम फलंदाजी करत ७ बाद २९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात
दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांवर बाद झाला. शफाली वर्मा हिने
आक्रमक शैलीत ७८ चेंडूत ८७ धावा केल्या. ती फलंदाजीत चमकलीच नाही, तर नंतर फिरकी गोलंदाजीतही झळकली — अनुभवी फलंदाज सून लुस आणि मॅरिझॅन
कॅप यांना बाद करत निर्णायक टप्पा साधला. दीप्ती शर्मा हिने मधल्या
षटकांत अप्रतिम गोलंदाजी करत ५ विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड (१०१) यांचा समावेश होता.
वोल्वार्डने सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावले, पण दुसऱ्या
टोकाला विकेट्स पडल्याने दक्षिण आफ्रिकेवर दबाव वाढला आणि अखेर भारताने विजय
मिळवला.
🇵🇰 पाकिस्तानकडून भारताला शुभेच्छा
भारतीय महिला संघाच्या या विजयावर पाकिस्तानच्या माजी
कर्णधार रमीझ राजा यांनी प्रतिक्रिया दिली — “भारताने पुन्हा एकदा दाखवून दिलं की तो
इतका उत्तम संघ का आहे. त्यांचं कॉम्बिनेशन आणि आत्मविश्वास विलक्षण आहे. ते
एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत आहेत आणि निकाल तुमच्या समोर आहेत,” असं रमीझ म्हणाले. तर माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर म्हणाले — “भारतीय महिला संघाने अप्रतिम क्रिकेट खेळलं. त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजी
दोन्ही विभागांत व्यावसायिकतेचं उत्तम उदाहरण घालून दिलं. या विजयाबद्दल टीम
इंडियाचं मनःपूर्वक अभिनंदन.”
भारताचा विजय — महिला क्रिकेटचा सुवर्ण अध्याय
या विजयासह भारताने इतिहासात पहिल्यांदाच महिला आयसीसी
वनडे विश्वचषक जिंकला. शफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा यांच्या अष्टपैलू
कामगिरीमुळे भारताने संपूर्ण जगात आपली क्रिकेट ताकद दाखवून दिली आहे.