"अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात परतले; अभियंत्याची कबुली – हा होता आयुष्यातला मोठा चुकीचा निर्णय"

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या
कार्यकाळानंतर H1B व्हिसा संपल्यामुळे भारतात परतलेल्या
एका इंजिनिअरचा अनुभव सोशल मीडियावर चर्चेत आहे. या व्यक्तीने रेडिटवर टाकलेली
पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, परदेशातून भारतात
परतल्याचा निर्णय चुकल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे. पोस्टनुसार, या इंजिनिअरने अमेरिकेत मास्टर्स पूर्ण केले आणि चार वर्षे सॉफ्टवेअर
इंजिनिअर म्हणून काम केले. मात्र 2022 मध्ये H1B व्हिसाची मुदत संपल्यानंतर त्याला भारतात परतावे लागले. आता भारतात
साडेतीन वर्षे राहिल्यानंतरही त्याला परतण्याचा निर्णय चुकीचा ठरल्याचे जाणवले
आहे. या इंजिनिअरने सांगितले की अमेरिकेत त्याला भारतातील पगाराच्या तुलनेत
"आठ पट जास्त" पगार मिळत होता. तिथली मासिक बचत भारतातल्या वार्षिक
बचतीपेक्षा जास्त असल्याचे त्याने नमूद केले. याशिवाय अमेरिकेतील वर्क-लाईफ बॅलन्स,
स्वच्छ हवा आणि पायाभूत सुविधा यांचा उल्लेख करून भारतात त्याची
परिस्थिती तुलनेने अधिक कठीण असल्याचेही त्याने स्पष्ट केले. “इथल्या कंपन्यांना माझ्या अमेरिकन डिग्री किंवा अनुभवाची फारशी किंमत
नाही. त्यामुळे मला अपेक्षित पगार मिळत नाही. सध्या मी मोठ्या संघर्षात आहे आणि
यातून कसे बाहेर पडायचे ते समजत नाही,” असे म्हणत त्याने
आपली पोस्ट संपवली.