हुतात्मा आणि वंदे भारत एक्सप्रेस रद्द; रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

सोलापूर: सोलापूरसह लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार
पावसामुळे सीना नदीला महापूर आला आहे. सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी सीना नदीवर
बांधण्यात आलेले पूल या पुरामुळे पाण्याखाली गेले आहेत. यापैकी मोहोळ तालुक्यातील
लांबोटी येथील पुणे महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने रस्ते वाहतुकीसह रेल्वे
वाहतुकही ठप्प झाली आहे. पुराच्या पाण्याची पातळी रेल्वे ब्रिजला लागत असल्याने
खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वेने वाहतूक
थांबवली आहे. यामुळे मुंबईहून सोलापूरकडे परत येणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेससह
इतर गाड्या अनुक्रमे केम,वडशिंगे, माढा आणि कुर्डूवाडी स्टेशनवर थांबवण्यात आले आहेत. दुसरीकडे सोलापूरवरून
मुंबई -पुणेकडे जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आले आहेत. रोज सकाळी सहा वाजता
निघणारी हुतात्मा एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तर सोलापूरहुन मुंबईला जाणारी
बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेस दुपारपर्यंत सोलापूर स्टेशनवरच राहिल्याने
प्रवाशांची तारांबळ उडाली. अखेर ही गाडीसुद्धा रद्द झाल्याचे जाहीर झाल्याने
प्रवाशांचा हिरमोड झाला. परदेश प्रवासाचे
नियोजन असणाऱ्या प्रवाशांनी मिळेल त्या वाहनाने हैदराबादला जाण्याचा पर्याय
निवडला. सुमारे रात्री एक पासून सोलापूर होऊन पुणे मुंबई कडे जाणाऱ्या गाड्या न
गेल्याने सोलापूर स्थानकावर अडकून पडलेल्या प्रवाशांची अवस्था दयनीय होती. लातूर,
उमरगा,बसवकल्याण, विजयपूर
आणि धाराशिव अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या प्रवाशांची सोलापूर रेल्वे
स्थानकावर संख्या जास्त जास्त आहे.