कणकवली निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; निलेश राणेंच्या स्टिंगनंतर रोहित पवारांचा भाजपवर जोरदार प्रहार

कणकवली नगरपरिषद निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्ररित्या मैदानात उतरल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही पक्षातील उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू असताना मालवणमध्ये मोठा हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. शिवसेना नेते आणि आमदार निलेश राणे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी तब्बल २५ लाख रुपये सापडल्याचा दावा त्यांनी केला आहे. निलेश राणे यांनी मालवणमधील भाजपचे जिल्हा चिटणीस विजय केनवडेकर यांच्या घरी अचानक धाड टाकली. त्यांच्यावर मतदारांना पैसे वाटण्याचा आरोप करत राणेंनी लगेचच निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून कायदेशीर कारवाईची मागणी केली. त्यांच्या या कृतीने मालवण आणि कणकवलीत मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. राणे यांनी यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरही गंभीर आरोप केले. चव्हाण मालवणमध्ये येण्यामागे संशय असल्याचे ते म्हणाले. “मालवणमध्ये 6–7 घरांमध्ये रोज पैशांच्या बॅगा येतात. भाजपचे कार्यकर्ते तिथून पैसा घेऊन जातात. बाहेरून आलेल्या लोकांनी ही संस्कृती आणली आहे,” असे निलेश राणे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राणेंच्या उघडकीबद्दल त्यांचे अभिनंदन करत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “निवडणुका जिंकण्यासाठी वारेमाप पैशाचा वापर करणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा उघड केल्याबद्दल निलेश राणे यांचे आभार. सत्ता आणि पैसा वापरून निवडणुका जिंकणे हा भाजपचा फॉर्म्युला आहे,” असे त्यांनी लिहिले.

पुढे ते म्हणाले, “मित्रपक्षांच्या आमदारानेच भाजपचे कपडे फाडल्याने ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणाऱ्या भाजपाने आता नाकाने कांदे सोलणे थांबवावे आणि आपले पाय चिखलात माखलेले असल्याचे मान्य करावे.” कणकवली नगरपरिषद निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे आरोप–प्रत्यारोपांचे राजकारण आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.