उच्च न्यायालयाचा दणका; मतमोजणीची तारीख ही बदलली; २१ डिसेंबर रोजी होणार मतमोजणी

मुंबई : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीच्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे. उद्या म्हणजेच ३ डिसेंबरला होणारी मतमोजणी रद्द करण्यात येऊन नवीन तारीख म्हणून २१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे. या संदर्भात हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत. राज्यातील काही नगरपरिषदांच्या आणि काही नगरसेवक मतदार संघातील निवडणुका पुढे ढकलण्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे आज मंगळवारी मतदान झाले तरी निकालासाठी 21 डिसेंबरची वाट सर्वांना पहावी लागणार आहे. सध्या राज्यातील काही भागात मतदान प्रक्रिया सुरू असून काही नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुका २० डिसेंबरला होणार आहेत. त्यामुळे दोन्ही निवडणुकांची मतमोजणी एकाच दिवशी घ्यावी, अशी मागणी करत याबाबत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

याचिकेवर आज सुनावणी झाली आणि न्यायालयाने दोन्ही मतमोजणी एकाच दिवशी घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे निवडणूक आयोगाने तातडीने निर्णय घेत मतमोजणीची तारीख पुढे ढकलली आहे. या निर्णयामुळे सर्व उमेदवार, पक्ष तसेच मतदारांमध्ये उत्सुकता वाढली असून निकालासाठी आणखी १८ दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या आदेशानंतर राज्यातील निवडणूक प्रक्रियेला नवा मोड आला असून आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरच्या मतमोजणीकडे लागले आहे.