मुसळधार पावसाने राज्यभरात 12 मृत्यू, नांदेडमध्ये 9 जणांचा बळी; कोकण-विदर्भात अतिवृष्टी, पवईत युवक वाहून गेला पण बचावला

मुंबईतील पवई फुलेनगर परिसरात पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात एक युवक वाहून गेला. सुदैवाने वेळेवर मदत मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्यभर मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. त्यापैकी नांदेड जिल्ह्यात पूरस्थितीत ९ जणांचा मृत्यू झाला. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकं पाण्याखाली गेली आहेत. अनेक गावं जलमय झाली असून ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेकडो जनावरांचा मृत्यू झाला आहे. नागरिकांची घरं पाण्याखाली गेल्याने त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलं आहे. नांदेडमधील पूरस्थिती आता हळूहळू सामान्य होत आहे. पाऊस ओसरल्यानं प्रशासनाने पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून जेवणखाण्याची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास लष्कराची मदत घेण्यात आल्याचेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.