मुसळधार पावसाने मुंबई-ठाणे-बिकट, पुण्यात घाटमाथ्यावर रेड अलर्ट; धरणे १००% भरली, विसर्गामुळे नदीपातळीत वाढ

पुणे : महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती बिकट झाली आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरात पावसामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी केला आहे. आज पहाटेपासून थोडी विश्रांती मिळाल्याने पुणे शहरात प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केलेली नाही. त्यामुळे आज सर्व शाळा सुरू राहणार आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धरणे १००% भरली या हंगामात पुण्यातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही चारही धरणे १०० टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातून तब्बल ३९ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून, भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. एकतानगरमध्ये पाणी घरात शिरले शहरातील एकतानगर परिसरात पावसाचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. गुडघाभर पाण्यातून वाट काढत एनडीआरएफच्या जवानांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. दरम्यान, मुळशी तालुक्यात जोरदार पाऊस सुरू असून, पुरंदर तालुक्यातही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.