नागपूर-जबलपूर महामार्गावर हृदयद्रावक घटना; पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून पतीचा प्रवास, माणुसकीवर प्रश्नचिन्ह

नागपूर, ११ ऑगस्ट २०२५ — रक्षाबंधनाच्या
दिवशी नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडलेली एक घटना माणुसकीला काळीमा
फासणारी ठरली आहे. देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरफाटा परिसरात झालेल्या
अपघातात ग्यारसी अमित यादव या ३५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. तिचा पती अमित
भुरा यादवसोबत मोटारसायकलवरून करणपूरकडे जात असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकने
त्यांच्या दुचाकीला कट मारला आणि ग्यारसी रस्त्यावर पडून ट्रकच्या चाकाखाली आली. अपघातानंतर
अमितने हात जोडून वाहनचालकांना आणि रस्त्यावरील लोकांना मदतीची विनवणी केली,
मात्र कोणीही थांबले नाही. हताश अवस्थेत त्याने पत्नीचा मृतदेह
दुचाकीवर बांधून मध्यप्रदेशातील सिवनी येथील आपल्या गावी नेण्याचा निर्णय घेतला.
हा हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाला. रस्त्यात
काहींनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो भीती आणि
धक्क्यामुळे थांबला नाही. शेवटी महामार्ग पोलिसांनी मोरफाटा परिसरात त्याला अडवले
आणि मृतदेह ताब्यात घेऊन नागपूरच्या मेयो हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी
पाठवला.
अमित आणि ग्यारसी गेल्या १० वर्षांपासून लोणारा परिसरात राहत होते. रक्षाबंधनाच्या शुभदिनी गावी जाण्याचे ठरवले होते, पण नियतीने दुर्दैवी प्रसंग घडवला. या घटनेने माणुसकीच्या अभावावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त करत “अजूनही समाजात संवेदनशीलता जिवंत आहे का?” असा सवाल केला आहे. पोलिसांनी ट्रकचालकाचा शोध सुरू केला असून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.