डिफेंडर गाडी प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक आरोप – “२१ आमदारांना ठेकेदाराकडून गाड्या भेट”

बुलढाणा: राज्याच्या राजकारणात सध्या ‘डिफेंडर’ गाडीचा वाद चांगलाच गाजत आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या तब्बल २ कोटी रुपयांच्या आलिशान डिफेंडर गाडीने चर्चेचे केंद्रस्थान घेतले आहे. हा मुद्दा विरोधकांनी नव्हे तर भाजपच्याच एका स्थानिक नेत्याने – विजय शिंदे यांनी उचलून धरला, आणि त्यानंतर या गाडीभोवती राजकीय तापमान वाढले आहे. विजय शिंदे यांनी आमदार गायकवाड यांच्यावर आरोप केला की, ही गाडी त्यांनी एका कंत्राटदाराकडून कमिशन म्हणून घेतली आहे. त्यावर आमदार गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं की, ही गाडी माझी नाही, माझ्या नातेवाईकाची आहे. माझ्यावर राजकीय आकसापोटी आरोप केले जात आहेत.”

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप:

या प्रकरणात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट हल्ला चढवला आहे. ते म्हणाले – महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षातील २१ आमदारांना एका ठेकेदाराकडून डिफेंडर गाड्या भेट म्हणून देण्यात आल्या आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर असून, राज्यातील भ्रष्टाचाराच्या नव्या पद्धतीचा तो नमुना आहे.” सपकाळ पुढे म्हणाले – मागच्या काळात ‘५० खोके एकदम ओके’ अशी घोषणा झाली होती. आता दिवाळीचे फटाके फुटतानाच ‘२१ डिफेंडर गाड्या’ ठेकेदाराकडून सत्ताधाऱ्यांना गिफ्ट झाल्या आहेत. आता महाराष्ट्राला प्रश्न आहे – हे २१ आमदार कोण आणि तो ठेकेदार कोण? बुलढाण्यातील गाडी २१ वी आहे की २२ वी, हे शोधायला हवं.”

जनप्रतिनिधी लोकांसाठी, लक्झरीसाठी नाही’ – सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ यांनी आमदारांना लक्षात आणून दिलं की, “आपण लोकशाहीमध्ये राहतो. आमदार-खासदार हे जनतेचे प्रतिनिधी आहेत. त्यांना स्टिकर्स लावून, पोलिसांचा लवाजमा घेऊन फिरण्याची गरज नाही. मी स्वतः आमदार होतो, पण माझ्या गाडीवर कधीही आमदाराचे स्टिकर नव्हते.” त्यांच्या या विधानांनंतर राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा नवा राऊंड सुरू झाला आहे.