सोलापूर-मुंबई विमानसेवेला हिरवा कंदील; मंत्रिमंडळात व्हायबिलिटी गॅप फंडिंगला मंजुरी

सोलापूर – दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या सोलापूर–मुंबई विमानसेवेचा
मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत
सोलापूर–पुणे–मुंबई विमानसेवेसाठी व्हायबिलिटी गॅप फंडिंग देण्यास मंजुरी देण्यात
आली. सोलापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीसाठी मुंबई, बेंगलोर, दिल्लीसारख्या शहरांशी थेट विमानसेवा सुरू
करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. विमानसेवा नसल्याने अनेक उद्योजकांना
सोलापुरात येताना अडचणी येत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर
दौऱ्यादरम्यान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी
विमानसेवेबाबत चर्चा केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सेवा सुरू
करण्याचे आश्वासन दिले होते. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर मंत्रिमंडळ बैठकीत
हा निर्णय घेण्यात आला. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सोलापूर–मुंबई विमानसेवा
लवकरच सुरू होणार असून, यामुळे उद्योजक, व्यावसायिक आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.