ट्रम्प यांच्या घोषणेनंतर एमसीएक्सवर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण

गेल्या आठवडाभरात मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या किमतींनी विक्रमी पातळी गाठली होती. परंतु, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल' वर सोन्यावर कर (टॅरिफ) लागू होणार नाही,
अशी घोषणा केल्यानंतर सोमवारी बाजारात अचानक मोठी घसरण झाली. MCX
वर ९९९ शुद्धतेच्या १० ग्रॅम सोन्याचा दर सोमवारी १४०९ रुपये
(१.३८%) घसरून १,००,३८९ रुपयांवर आला.
याआधी ट्रेडिंग दरम्यान हा दर १,०१,१९९
रुपयांवर पोहोचला होता. MCX वर सोन्याची उच्चांकी पातळी १,०२,२५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, जी सध्याच्या दरापेक्षा १८६१ रुपये जास्त आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही या
घोषणेचा मोठा परिणाम दिसून आला. गोल्ड फ्युचर्सच्या किमती २.४८% घसरून ३,४०४.७० डॉलर प्रति औंसवर बंद झाल्या. देशांतर्गत बाजारात इंडियन बुलियन
ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, २४
कॅरेट सोन्याची किंमत १,००,२०१
रुपयांवरून घसरून ९९,९५७ रुपयांवर आली. २२ कॅरेट सोन्याचा दर
९७,५६० रुपये आणि २० कॅरेटचा दर ८८,९६०
रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प
यांच्या घोषणेमुळे गुंतवणूकदारांनी नफा वसुली सुरू केल्याने किमतीत ही घसरण झाली.
तथापि, जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि डॉलरच्या हालचालींवर
पुढील किंमत प्रवाह अवलंबून राहणार आहे.