लातूरचे देवघर झाले सुने सुने ; ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांचे निधन
सोलापूर: महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात सहा दशकाहून अधिक काळ
प्रभाव पडणारे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे शुक्रवारी पहाटे निधन
झाले. राज्य आणि केंद्रीय मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली
होती. लातूरचे नगराध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, लोकसभेचे सभापती या सोबतच केंद्रीय म्हणून त्यांनी सेवा बजावली. पाटील
यांच्या निधनाने लातूर येथील त्यांचे निवासस्थान "देवघर" सुने सुने झाले
आहे.
देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ
नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे दुःखद निधन झालं आहे. आज पहाटे (शुक्रवार, 12 डिसेंबर) अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती
खालावली होती. मागील अनेक वर्षांपासून राजकीय जीवनातून निवृत्त होते. राजकारणातील
अत्यंत अभ्यासू आणि स्वच्छ प्रतिमा असलेले राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले
जाते. राज्यासह देशाच्या राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून शिवराज पाटील
चाकूरकर यांची ओळख होती. भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे आणि अनुभवी
व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे शिवराज पाटील यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूरमध्ये झाला.
त्यांनी उस्मानिया विद्यापीठातून विज्ञान विषयात पदवी आणि
मुंबई विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1967-69 या काळात लातूर नगरपालिकेमध्ये काम करत राजकारणात पाऊल ठेवले. 1980 मध्ये शिवराज पाटील यांनी राष्ट्रीय राजकारणात काम करण्यास सुरवात केली. 1980 मध्ये ते लातूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले. त्यानंतर 1999 पर्यंत सलग सात वेळा त्यांनी निवडणूक जिंकत केंद्रीय राजकारणात आपला
दबदबा निर्माण केला.
2004 मध्ये भूषवले केंद्रीय गृहमंत्रीपद
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात
संरक्षण राज्यमंत्री, वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान,
अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स व अवकाश अशा
महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी त्यांनी सांभाळली. 1991 ते 1996
या काळात त्यांनी लोकसभा अध्यक्षपद भूषवले. 2004 मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतरही राज्यसभेतून गृहमंत्रिपद आणि
केंद्रीय जबाबदाऱ्या स्वीकारल्या होत्या. 2004 ते 2008
या काळात त्यांनी केंद्रात गृहमंत्रिपद भूषवले. 2008 मध्ये 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी
हल्ल्यानंतर झालेल्या व्यापक टीकेनंतर शिवराज पाटील यांनी 30 नोव्हेंबर 2008 रोजी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
त्यांच्या पश्चात मुलगा शैलेष पाटील चाकूरकर सुन अर्चना पाटील चाकूरकर आणि नातवंडे
असा परिवार आहे. आज लातूर येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
उद्या अंत्यसंस्कार
ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराजजी पाटील
चाकूरकर (वय९१) यांचे शुक्रवार, 12 डिसेंबर रोजी सकाळी सहा
वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. आज त्यांचे पार्थिव लातूर येथील
आदर्श कॉलनीतील 'देवघर' या निवासस्थानी
अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. उद्या शनिवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या
पार्थिवावर लातूर शहरापासून जवळच असलेल्या वरवंटी येथील शेतात अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहेत. यावेळी राज्यासह देशभरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार
आहेत. मितभाषी, सुसंस्कृत अशा या थोर नेत्याचे अकाली निधन
झाल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.