भीमनदी काठच्या गावांना पूराचा धोका – उजनी धरणातून 2 लाख क्यूसेक्सहून अधिक पाण्याचा विसर्ग

विजयपूर.    दिपक शिंत्रे

विजयपूर :- महाराष्ट्रातील उजनी धरण परिसर आणि भीमनदी काठावर सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी आणि सीना नद्या व इतर छोट्या नाल्यांमधून मिळून सुमारे 3 लाख क्यूसेक्स पाणी भीमनदीमध्ये सोडण्यात आले आहे. त्यामुळे विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्याच्या सीमा भागातील गावांना पूराचा मोठा धोका निर्माण झाला आहे.हिंगणी, बरगुडी, पाडनूर, शिरगूर, गुब्बेवाड, रोडगी, खेडगी, भुय्यार, मिरगी आदी भीमनदी पात्रातील गावांमध्ये प्रशासनाने हाय अलर्ट जाहीर केला आहे. महसूल व पोलीस विभागाच्या सहकार्याने ढोल वाजवून लोकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.खेडगी, भुय्यार, मिरगी, रोडगी, नागरळी, गुब्बेवाड, चिक्कमणूर आदी गावांतील ऊस व इतर पिकांमध्ये पाणी शिरले असून शेतजमिनी जलमय झाल्या आहेत. 2 लाखाहून अधिक क्यूसेक्स पाणी भीमनदीत सोडण्यात आले असून, हे पाणी मंगळवारी रात्री किंवा  इंडी तालुक्याच्या मर्यादेत येण्याची शक्यता आहे.खेडगी येथील बसवराजेंद्र मठ, मिरगी येथील जट्टिंगेश्वर मंदिर, बरगुडी, हिंगणी, गुब्बेवाड, पाडनूर, शिरगूर आदी गावांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने पूरग्रस्त भागात काळजी केंद्र उभारण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. इंडी तालुक्याच्या हद्दीत महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागात 9 बॅरेज असून, त्यातील हिंगणी, भुय्यार बॅरेजवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. यामुळे विजयपूर–कलबुर्गी व विजयपूर–सोलापूर रस्ते बंद करण्यात आलेआहेत. भीमनदीतील चनेगाव, हिंगणी, भुय्यार, कड्लेवाड बॅरेज ओव्हरफ्लो होत असून, सोंनजवळील पूलावरूनही पाणी वाहत आहे. यामुळे मिरगी–कडणी, हिंगणी–बरगुडी रस्ते बंद झाले आहेत.

पीक नुकसान पूरामुळे शिरगूर, चनेगाव, अणची, हिंगणी, रोडगी, खेडगी, मिरगी, भुय्यार, नागरळी आदी गावांतील सुमारे 800 एकर क्षेत्रातील पीक जलमय झाले आहे. ऊस, तूर, कपाशी, मका आदी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी पिके वाहून गेली आहेत. मुसळधार पावसामुळे रस्ते बंद झाले असून इंडी तालुक्यात गेल्या 4–5 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, नाले भरून वाहत आहेत. पाण्यामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. नाल्यावरील पाईप तुटल्यामुळे इंडी–मण्णूर रस्ता बंद झाला आहे. अर्जुणगी गावात काही घरात पाणी घुसल्यामुळे कुटुंबे बेघर झाली आहेत.

स्थानिक प्रशासनाची मदत: अर्जुणगी बके गावातील 6 घरात नाल्याचे पाणी शिरले असून, प्रशासनाने 20 जणांना शाळेत हलवून जेवणाची व्यवस्था केली आहे. तहसीलदार बी.एस. कडकभावी यांनी पूरग्रस्तांची घरे पाहणी करून मदतीचे आश्वासन दिले आहे.

    प्रशासनाची तयारी: इंडी एसी अनुराधा वस्त्रद व तहसीलदार बी.एस. कडकभावी यांच्या नेतृत्वाखाली ग्राम प्रशासन अधिकारी, पीडीओ, महसूल निरीक्षकांनी पूरग्रस्त गावांत तळ ठोकले असून, पूर स्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. नोडल अधिकारी नेमले गेले असून, प्रत्येक तासाला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.