झारखंडमध्ये जंगली हत्तींचा कहर; २४ तासांत दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू

रांची – झारखंडमध्ये जंगली हत्तींच्या हल्ल्यांनी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या २४ तासांत वेगवेगळ्या घटनांमध्ये जंगली हत्तींच्या हल्ल्यात दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. रामगढ जिल्ह्यातील मांडू ब्लॉकमधील वनक्षेत्रात चार जणांचा मृत्यू झाला, तर रांची जिल्ह्यातील अंगारा येथील जिदू गावात एका ३६ वर्षीय व्यक्तीचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. मृतांमध्ये शनिचरवा मुंडा (३६), अमूल महतो (३५), कनिया देवी (८५), सावित्री देवी (६५) आणि अमित कुमार राजवार (३२) यांचा समावेश आहे. रामगढचे विभागीय वन अधिकारी नितीश कुमार यांनी सांगितले की, रामगढ आणि बोकारो जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागातील जंगलांमध्ये सुमारे ४२ जंगली हत्तींचा कळप फिरत आहे. या हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी दोन जलद प्रतिसाद पथके आणि वनरक्षक तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, हत्तींच्या हल्ल्यांमुळे झालेल्या जीवित व मालमत्तेच्या नुकसानीबद्दल योग्य भरपाई देण्यात यावी तसेच भविष्यातील हल्ले रोखण्यासाठी प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.