भद्रावतीत शेतकऱ्याचा मृत्यू : दोन दिवसांपासून अंत्यसंस्कारावरून वाद, तहसीलदार-नायब तहसीलदार निलंबित
भद्रावती (चंद्रपूर)
मोरवा येथील शेतकरी परमेश्वर ईश्वर मेश्राम (वय ५५) यांनी २६
सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
तब्बल ११ दिवस जीवन-मरणाशी झुंज दिल्यानंतर, त्यांचा ६
ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजता मृत्यू झाला.
मात्र, मृत्यूनंतर दोन दिवस उलटूनही कुटुंबियांनी
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी प्रभाकर धानोरकर यांच्या पत्नी
खासदार प्रतिभा धानोरकर आणि त्यांच्या भावावर अनिल धानोरकर यांच्यावर गंभीर आरोप केले
आहेत.
कुटुंबियांचा आरोप —
“दिवंगत बाळू धानोरकर यांच्याशी झालेल्या
जमीन व्यवहारात आमची फसवणूक झाली. न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला असतानाही
महसूल अधिकारी आदेशाची अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळेच परमेश्वर मेश्राम यांनी
आत्महत्या केली,” असा आरोप नातलगांनी केला आहे.
त्यांनी स्पष्ट केले की —
“जोपर्यंत न्यायालयाच्या आदेशानुसार आमची
नावे सातबाऱ्यावर नोंदवली जात नाहीत आणि दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही,
तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही.”
न्यायालयाचा आदेश आणि महसूल विभागाची टाळाटाळ —
न्यायालयाने गावनमुना ७ मध्ये मेश्राम कुटुंबाची नावे नोंदवण्याचे
आदेश दिले होते, मात्र महसूल विभागाने “मालकी हक्कावर वाद
आहे” या कारणाखाली आदेशाची अंमलबजावणी टाळली. त्यामुळे मेश्राम मानसिक तणावाखाली
होते.
प्रशासनाची कारवाई — तहसीलदार आणि नायब तहसीलदार निलंबित
घटनेनंतर महसूल विभागाने तहसीलदार राजेश भांडारकर आणि नायब तहसीलदार
सुधीर खांडरे यांना तत्काळ निलंबित केले. चौकशीत दोघांनीही महसूल
अधिनियम १९६६ आणि नागरी सेवा वर्तन नियम १९७९ चे उल्लंघन केल्याचे आढळले.
शेतकरी संघटनांनी दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तत्काळ
अटक करण्याची मागणी केली आहे.
गावात शोककळा, आंदोलनाची चेतावणी
या घटनेने मोरवा गावात तसेच चंद्रपूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली
आहे. ग्रामस्थांनी आणि शेतकरी संघटनांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलनाचा इशारा दिला
आहे.
पोलीस
प्रतिक्रिया —
“वैद्यकीय अहवाल आल्यानंतर चौकशी करून
दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल,” असे ठाणेदार योगेश्वर
पारधी यांनी सांगितले.