एलॉन मस्कचा DoGE विभाग आठ महिने आधी बंद; 2.5 लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली

अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेला DoGE (Department of Government Efficiency) विभाग आता अधिकृतपणे बंद करण्यात आला आहे. हा विभाग २० जानेवारी २०२५ रोजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकारी आदेशानुसार सुरू करण्यात आला होता आणि ४ जुलै २०२६ पर्यंत काम करण्याचे नियोजन होते. मात्र, नियोजित वेळेच्या आठ महिने आधीच त्याला बंद करण्यात आले. माध्यमांच्या माहितीनुसार, DoGE ने आपल्या कार्यकाळात 2,50,000 पेक्षा जास्त सरकारी कर्मचार्‍यांना थेट किंवा लवकर निवृत्ती व खरेदी पॅकेजेसद्वारे कामावरून कमी केले. एका टप्प्यावर हा विभाग अत्यंत सक्रिय होता, परंतु कालांतराने कर्मचारी आणि व्यवस्थापनातील बदलांमुळे त्याची गती मंदावली. यातील अनेक वरिष्ठ अधिकारी आता विविध सरकारी कार्यालयांमध्ये समाविष्ट झाल्याचे सांगितले जाते. DoGE वर सर्वाधिक टीका झाली ती राष्ट्रीय अणु सुरक्षा प्रशासनातील (NNSA) ३५० कर्मचाऱ्यांना एकदम काढून टाकण्याच्या आदेशामुळे. हा निर्णय इतका वादग्रस्त ठरला की ऊर्जा विभागाला काही आठवड्यांनी तो निर्णय मागे घ्यावा लागला आणि ३२२ कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त करण्यात आले. या घटनेनंतर DoGE च्या कार्यपद्धतीवर, संस्कृतीवर आणि निर्णयक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

DoGE विभाग हा ट्रम्प प्रशासनाच्या ‘Project 2025’ चा महत्त्वाचा भाग होता. सुरुवातीला या विभागाचे नेतृत्व एलॉन मस्क आणि उद्योजक विवेक रामास्वामी यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र, विभाग सुरू होण्यापूर्वीच रामास्वामी बाहेर पडले. पॉलिटिकोच्या रिपोर्टनुसार, रामास्वामींना हटवण्यात मस्कची भूमिका निर्णायक होती. एलॉन मस्क यांनी DoGE च्या माध्यमातून २ ट्रिलियन डॉलर्स (सुमारे १७० लाख कोटी रुपये) सरकारी खर्चात बचत करण्याचे आश्वासन दिले होते. DOGE च्या वेबसाइटनुसार, विभागाने २१४ अब्ज डॉलर्सची बचत केल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु पॉलिटिकोच्या तपासणीत हे बचतीचे आकडे फुगवलेले आणि वास्तवापासून दूर असल्याचे समोर आले आहे. DoGE चे अकस्मात बंद होणे आणि त्याच्या कारभारावर उठलेले प्रश्न प्रशासन, धोरणे आणि सरकारी व्यवस्थापनाबाबत मोठी चर्चा निर्माण करतात.