वडोदऱ्यात गणेशमूर्तीवर अंडी फेकल्याने खळबळ; पोलिसांच्या उपस्थितीत घडला प्रकार, चार जण ताब्यात

वडोदरा (गुजरात) | २५ ऑगस्ट २०२५

उद्या देशभरात गणेश चतुर्थीचा उत्साह असताना, गुजरातच्या वडोदरा शहरात या सणाला गालबोट लावणारी घटना समोर आली आहे. पाणीगेट परिसरातील निर्मल पार्क युथ क्लबने स्थापन केलेल्या गणपती मूर्तीवर काल रात्री ३ वाजता अंडी फेकली गेली.

घटना कशी घडली?
गणपती मंडळाचे सदस्य सत्यम यांनी सांगितले की, “आम्ही मूर्ती घेऊन जात असताना तिसऱ्या मजल्यावरून कुणीतरी अंडी फेकली. पोलिसांना कळवले असता, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवरही अंडी फेकण्यात आली.”
ही घटना मजार मार्केट परिसरात घडली असून, त्यानंतर परिसरात तणाव पसरला.

पोलिसांची कारवाई
शहर पोलिस ठाण्याचे पीआय राजेंद्र चौहान यांनी सांगितले की, या प्रकरणात चौकशी सुरू असून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

विश्व हिंदू परिषदेची प्रतिक्रिया
विहिंपचे वडोदरा महानगर सचिव विष्णू प्रजापती यांनी संताप व्यक्त करत म्हटले की,
पोलिसांच्या उपस्थितीत अंडी फेकली जाणे ही मोठ्या कटाची निशाणी आहे. या समाजकंटकांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अन्यथा अशा घटना थांबणार नाहीत.”