पश्चिम बंगाल हादरलं! दुर्गापूरमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; पाच आरोपी अटकेत
दुर्गापूर (पश्चिम बंगाल): राज्यातील
दुर्गापूर येथे एका विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण
देश हादरला आहे. ओडिशातील बालासोर येथील रहिवासी असलेली पीडिता शुक्रवारी रात्री
तिच्या मित्रासोबत कॉलेज कॅम्पसच्या बाहेर उभी असताना पाच तरुणांनी तिचं अपहरण
करून जंगलात नेऊन क्रूरपणे अत्याचार केला. घटनेनंतर आरोपींनी पीडितेला ५,००० रुपये देऊन गप्प बसण्याची धमकी दिली. भीतीपोटी तिने सुरुवातीला फक्त
मारहाणीची तक्रार केली, मात्र पोलिस तपासात सत्य बाहेर आलं
आणि सामूहिक बलात्काराचा खुलासा झाला. आसनसोल-दुर्गापूरचे पोलीस आयुक्त सुनील
कुमार चौधरी यांनी सांगितलं की, “पाचही आरोपींना अटक करण्यात
आली आहे. पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळेल, यासाठी आम्ही
कटिबद्ध आहोत.” १२ ऑक्टोबर रोजी तिघांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं,
जिथे त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर
उर्वरित दोघांना ९ दिवसांची कोठडी देण्यात आली.
जंगलात अत्याचाराची रात्र पोलिसांच्या तपासानुसार, शुक्रवारी रात्री ८ ते ८:४५ दरम्यान ही घटना घडली. विद्यार्थिनी तिच्या मित्रासोबत असताना तीन जणांनी तिला घेरलं आणि मोबाईल हिसकावून घेतला. त्यानंतर आणखी दोन जण आले आणि पाचही आरोपींनी तिचं अपहरण करून जवळच्या जंगलात नेलं, जिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, “माझ्या मुलीला अजूनही प्रचंड वेदना होत आहेत. आम्ही तिला ओडिशाला परत घेऊन जाण्याचा विचार करत आहोत.”
ममतांवर वडिलांचा हल्लाबोल पीडितेच्या वडिलांनी राज्य सरकारवर टीका करत म्हटलं — “मुख्यमंत्री स्वतः महिला आहेत, तरीही त्या अशा घटनांकडे दुर्लक्ष करत आहेत. बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन असल्यासारखं वाटतं. आम्हाला आमच्या मुलीच्या सुरक्षेची चिंता आहे.”