महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर भाजपाला अनुकूल प्रभागरचना झाल्याची विरोधकांचा आरोप

सोलापूर दि. ३ ( प्रतिनिधी ) महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेला प्रभाग रचनेचा प्रारुप आराखडा आज महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी जाहीर केला. या प्रभाग रचनेवर काँग्रेस पक्षाने टीका केली आहे. भाजपाला अनुकूल प्रभागरचना केल्याचा आरोप त्यांनी प्रशासनावर केला आहे.

    २०११ मध्ये झालेल्या जनगणनेतील लोकसंख्येचा आधार घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये २६ प्रभाग असून सदस्यांची संख्या १०२ आहे. चार सदस्यांचा एक प्रभाग याप्रमाणे २४ प्रभाग असतील तर तीन सदस्य असलेले दोन प्रभाग आहेत.  प्रभाग रचना तयार करताना लोकसंख्येत दहा टक्के नैसर्गिक वाढ ग्रुहीत धरण्यात आली असल्याचे आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी पत्रकारांना सांगितले. निवडणूक आयोग आणि शासनाचा नगरविकास विभाग यांनी घालून दिलेल्या निकषानुसार ही प्रभाग रचना करण्यात आली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

      हा प्रारुप आराखडा महापालिकेच्या कौन्सिल हाँलमध्ये लावण्यात आला आहे. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरदेखील टाकला आहे. तो पाहून नागरिक १५ सप्टेंबर पर्यंत आपल्या हरकती व सुचना आमच्या निवडणूक कार्यालयात देऊ शकतात. १६ ते २२ सप्टेंबर दरम्यान जिल्हाधिकारी या हरकतींवर सुनावणी घेतील. २३ ते २५ सप्टेंबर दरम्यान हा आराखडा शासनाच्या नगरविकास विभागाकडे जाईल. तिथून तो २६ ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येईल.  नंतर ९ ते १३ आँक्टोंबर दरम्यान हा प्रारुप आराखडा अंतिम जाहीर होईल, असेही ओम्बासे यांनी सांगितले. या प्रारुप आराखड्याचे राज्य निवडणूक आयुक्तांसमोर २९ आँगस्टला सादरीकरण झाले आहे अशी माहीतीही आयुक्तांनी दिली.

     आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाची सोडत आयोगाच्या निर्देशानुसार काढली जाईल. मतदारांची संख्या जुलै २०२५ पर्यंतची निश्चित केली आहे. याबाबतीत आयोग किंवा शासन जो आदेश देतील त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल असेही आयुक्त ओम्बासे यांनी सांगितले.

      प्रभाग रचना तयार करताना महानगरपालिका क्षेत्रातील कोणतेही प्रगणक गट फोडण्यात आलेले नाहीत. प्रभागाची लोकसंख्या त्या प्रभागाच्या सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के कमी किंवा जास्त या मर्यादेतच ठेवण्यात आलेली आहे. केवळ प्रभाग क्र.६ व २६ या २ प्रभागांची लोकसंख्या कमाल मर्यादेपेक्षा अनुक्रमे ३० व २४ ने जास्त आहे. प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, नाले, रस्ते, रेल्वे रुळ, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन निश्चित करण्यात आली आहे. या प्रभागास आवश्यक रस्ता, फ्लायओव्हर याचा विचार करुन प्रभागाची रचना करण्यात आली आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

       प्रारुप प्रभागांचे एकत्रित नकाशा तसेच प्रत्येक प्रभागाचे स्वतंत्र नकाशे सोलापूर महानगरपालिकेच्या कौन्सिल हॉल येथे कार्यालयीन वेळेत सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध असतील. प्रारुप प्रभागांचा एकत्रित नकाशा सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयामध्येही प्रसिध्द करण्यात आला आहे.प्रारुप प्रभागांचा एकत्रित नकाशा व सर्व प्रभागांचे नकाशे आणि अधिसूचना सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळ www.solapurcorporation.gov.in

प्रसिद्ध करण्यात येईल, असे डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.

      या पत्रकार परिषदेस अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगरचना उपसंचालक मनीष भिष्णूरकर, नगर अभियंता सारिका आकुलवार, निवडणूक विभागाचे अधिक्षक ओमप्रकाश वाघमारे, सहाय्यक अभियंता महेश क्षिरसागर, यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

        नकाशांसाठी शुल्क आकारणी

प्रभाग रचनेच्या प्रारुप आराखड्यातील सर्व प्रभागांचा एकत्रित नकाशा हवा असल्यास  ७ हजार रुपये भरावे लागतील. एका प्रभागाच्या नकाशासाठी ७०० रुपये शुल्क आहे. शासनाची अधिसूचना हवी असेल तर प्रत्येक पानास ३ रुपये याप्रमाणे आकारणी केली जाईल. नकाशा मिळण्यासाठी नागरिकांनी अभिलेखापाल कार्यालय, सोलापूर महानगरपालिका येथे अर्ज करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

      हरकतीसाठी १५ सप्टेंबरची मुदत

प्रारुप प्रभाग रचनेवर नागरिकांनी हरकती व सूचना सादर करण्याचा कालावधी ३ ते १५ सप्टेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. या हरकती व सूचना सोलापूर महानगरपालिका निवडणूक कार्यालय, डॉ. द्वारकानाथ कोटणीस शॉपिंग सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सोलापूर येथे प्रत्यक्ष सादर कराव्यात. हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीसाठी स्वतंत्ररीत्या कळविण्यात येणार आहे. सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू राहणार आहे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

       ३७,३१६ लोकसंख्येचा प्रभाग

प्रभागांची एकूण संख्या २६ असून चार सदस्यीय प्रभाग २४ तर तीन सदस्यीय प्रभाग २ (प्रभाग क्र.२५ व २६) आहेत. सोलापूर  महानगरपालिका क्षेत्राची २०११ च्या  जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या ९ लाख ५१ हजार ५५८ आहे. यामध्ये अनूसुचित जातीची लोकसंख्या  १ लाख ३८ हजार ७८, अनुसूचित जमातीची लोकसंख्या  १७ हजार ९८२ आहे. यासाठी चार सदस्यीय प्रभाग सरासरी ३७ हजार ३१६ लोकसंख्या तर तीन सदस्यीय प्रभागात सरासरी २७ हजार ९८७ लोकसंख्या धरण्यात आली आहे. निवडून दयावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या  १०२ आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले.

      महापालिकेत नागरिकांची गर्दी

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठीची प्रारूप प्रभाग रचना आज सकाळी दहा वाजता महापालिकेच्या कौन्सिल हॉल सभागृहाचे आवारात नागरिकांना पाहण्यासाठी लावण्यात आली आहे. येथील व्यवस्थित महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी पाहणी केली. दरम्यान महापालिका आवारात प्रारुप प्रभाग रचना आणि नकाशे पाहण्यासाठी राजकीय नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, इच्छुक तसेच नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

        २०१७ मधील पक्षीय बलाबल

सोलापूर महापालिकेच्या स्थापनेनंतर प्रथमच सन २०१७ मध्ये महापालिकेत भाजपाची सत्ता आली. एकूण १०२ सदस्यांपैकी भाजपा  ४९, शिवसेना  २१, काँगेस  १४, राष्ट्रवादी काँग्रेस ४, एमआयएम ९, बसपा ४, माकपा १ असे सदस्य संख्याबळ होते.  यापूर्वी महापालिका निवडणूक २०१७ मध्ये चार सदस्यांचा एक प्रभाग होता. यात प्रत्येकी दोन जागा महिलांसाठी तर दोन जागा सर्वसाधारण अशी रचना होती. त्यामुळे सर्वांना संधी उपलब्ध झाली होती.

             न्यायालयात दाद मागणार

यापूर्वी २०२७ मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक चार सदस्यीय प्रभागरचनेनुसार झाली होती. त्यावेळी भाजपाने सत्ता मिळवली होती. यावेळी तयार केलेल्या प्रभाग रचनेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. २०१७ चीच पुनरावृत्ती आहे. २०११ च्या जनगणनेप्रमाणे प्रभाग रचना करणे चुकीचे आहे. कारण गेल्या चौदा वर्षात शहराची लोकसंख्या वाढली आहे. नगरसेवकांची संख्या आणखी किमान पंधराने वाढेल. लोकप्रतिनिधी वाढले तरच शहराचा विकास वाढतो. सदस्य कमी करण्याचा अधिकार प्रशासनाला नाही. त्यामुळे काँग्रेस याबाबत न्यायालयात दाद मागणार आहे.

                     चेतन नरोटेकाँग्रेस