डीजे बंदीसाठी डॉक्टर्स उतरले रस्त्यावर

सोलापूर, दि. २५- डीजेमुक्त सोलापूर अभियान व लेसर लाईट बंदीच्या विरोधात सोमवारी सकाळी शेकडो डॉक्टर्स रस्त्यावर उतरले.‌ त्यांनी रॅली काढून पोलीस आयुक्तांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता ऑफिसर क्लब ते पोलीस आयुक्तालय या मार्गावरून डॉक्टरांचीही रॅली काढण्यात आली. डीजेमुक्त सोलापूर कृती समितीच्या नेतृत्वाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे होते. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा (नॅशनल इंटिग्रेटेड मेडीकल असोसिएशन), हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन, होमिओपॅथी असोसिएशन, इंडियन डेंटल असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी, गांधी नाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान यासह छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टर्स या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये डॉक्टरांच्या हातामध्ये 'डीजेसाठी नाही सोलापूरच्या आरोग्याला हो, शांत सोलापूर, सुंदर सोलापूर अशा आशयाचे फलक हात होते. डॉक्टरांची रॅली पोलीस आयुक्तालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांच्या शिष्टमंडळाबरोबर पोलीस आयुक्त एम राज कुमार यांची बैठक झाली. या बैठकीत अनेक डॉक्टरांनी डीजेलेसर व  फ्लड लाईट होणाऱ्या त्रासाबाबत माहिती दिली. यावेळी डॉक्टरांनी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस आयुक्तांना  दिले. त्यावेळी पोलीस आयुक्त एम राज कुमार यांनी उत्सवातील वाढत्या आवाजावर नियंत्रण आणण्यासाठी सर्व समाज घटकांना विश्वासात घेऊन योग्य ते प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी डॉक्टरांना दिली. यावेळी आयएमएच्या अध्यक्षा डॉ. मंजूषा शहा, निमाचे सोलापूर शाखा अध्यक्ष डॉ. नागनाथ जिड्डीमनी, हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय मंठाळे व होमिओपॅथी डॉक्टर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील वरळे, इंडियन डेंटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कौस्तुभ तांबेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची उपस्थिती होती. या रॅलीमध्ये डॉ. शिवरत्न शेटे, डॉ. विनायक टेंभुर्णीकर, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, डॉ. सुदीप सारडा, डॉ. बसवराज कोलूर, डॉ. मिलिंद शहा, डॉ. नवनीत तोष्णीवाल, डॉ. आसित चिडगुपकर, डॉ.संदीप भागवत, डॉ. सुनील वरळे आदींची उपस्थिती होती.