कनरीचे श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींवरील जिल्हा बंदी काॅग्रेसचे कारस्थान
विजयपूर : काँग्रेस पक्षातील अंतर्गत कारस्थानामुळे आणि जिल्हा प्रभारी मंत्र्यांच्या संगनमताने कनरीचे श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींना विजयपूर जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असा गंभीर आरोप कर्नाटक सेंद्रिय बियाणे प्रमाणन संस्थेचे माजी अध्यक्ष विजुगौडा पाटील यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, प्रभारी मंत्र्यांनी सांगितल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कनरी स्वामींना जिल्ह्यात येण्यास मज्जाव केला आहे, हे चुकीचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ हा आदेश मागे घ्यावा, अन्यथा मोठ्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी इशारा दिला.
ते पुढे म्हणाले की, कनरी स्वामींनी आयुर्वेदिक रुग्णालय उभारून आरोग्य सेवा, अनाथ मुलांसाठी शिक्षण, अनेक शाळांचे दत्तक ग्रहण, तसेच गुरुकुल स्थापनेसारखी मोठी कामे केली आहेत. विजयपूरमध्येही भारतीय संस्कृतीच्या प्रचारासाठी गुरुकुल स्थापन करणार आहेत. हीच गोष्ट काँग्रेस नेत्यांना न रुचल्याने त्यांनी स्वामींना त्रास देण्यासाठी षड्यंत्र रचले आहे. बंथनाळ शिवयोगींनी उभारलेली पवित्र संस्था बीएलडीई आज काही जणांची खाजगी संपत्ती झाली आहे. तिथे गरीब वर्गातील मुलांसाठी शिक्षण मिळवणे केवळ स्वप्न आहे, असेही त्यांनी नमूद केले. कनरी स्वामींनी अनेक मठाधीश घडवले आहेत. ते स्वतः विजयपूर जिल्ह्यातील असून महाराष्ट्रात मोठ्या मठाचे नेतृत्व करत आहेत. शेतकरी सेवा व अनेक शैक्षणिक संस्था प्रभावीपणे चालवत आहेत, याचा आपल्याला अभिमान असायला हवा. कोविड काळात त्यांनी दिलेली सेवा अद्वितीय होती. ‘चालते बोलते देव’ म्हणून ओळखले जाणारे श्री सिद्देश्वर स्वामी बहुतेक वेळा कनरी मठातच राहत होते, असेही त्यांनी सांगितले. कनरी स्वामी हे पक्षपाती किंवा जातीयवादी नसून, सर्वसमावेशक वृत्तीचे आहेत. याआधी ज्ञानयोगाश्रमातील एका स्वामींनी देवालयातील हुंडीतील पैसे सरकार वापरत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्याच शक्तींनी आज कनरी स्वामींविरोधात कारस्थान रचले आहे, असा आरोपही त्यांनी केला.
### श्रींच्या नावाचा वापर भाषणात
श्री सिद्देश्वर महास्वामी हे ‘चालते बोलते देव’ आहेत. मात्र जिल्हा प्रभारी मंत्र्यांनी निवडणुकीत वारंवार त्यांचे नाव वापरले. जिल्ह्यातील कोणत्याही उमेदवाराने प्रचारात त्यांचे नाव वापरले नाही. मात्र प्रभारी मंत्र्यांनी मात्र त्यांचे नाव सतत घेतले. या संदर्भात मी स्वतः चालते बोलते देव श्री सिद्देश्वर स्वामींना हे सांगितले होते की, काही लोक तुमचे नाव वापरत आहेत. त्यावर त्यांनी ‘भरलेला कुंभ कधीच सांडत नाही’ असे शांतपणे उत्तर दिले, असे विजुगौडा यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत भाजप नेते संजय पाटील कनमडी, संतोष कुरदड्डी, भीमनगौडा बिरादार, विनायक ममदापूर, विजय जोशी आदी उपस्थित होते.