दिल्लीतील हरिनगर दुर्घटना : भिंत कोसळून आठ जणांचा मृत्यू

राजधानी दिल्लीतील हरिनगर परिसरात शनिवारी पावसादरम्यान
मोठा अपघात घडला. जैतपूर पोलिस स्टेशनअंतर्गत बाबा मोहन राम मंदिराजवळील समाधी
स्थळाची भिंत कोसळून सुमारे आठ जण गाडले गेले. या घटनेत सर्व आठ जणांचा मृत्यू
झाला आहे. मृतांमध्ये तीन पुरुष – शबीबुल (३०), रबीबुल (३०), मुत्तू
अली (४५), दोन महिला – रुबिना (२५) व डॉली (२५), दोन लहान मुली – रुखसाना (६) व हसीना (७) आणि एक मुलगा हाशिबुल यांचा
समावेश आहे. प्रारंभी जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलेल्या हाशिबुलवर उपचार
सुरू होते, मात्र त्याचाही मृत्यू झाला. दिल्ली अग्निशमन
विभागाने सर्वांच्या मृत्यूची पुष्टी दिली आहे. अतिरिक्त डीसीपी दक्षिण पूर्व
ऐश्वर्या शर्मा यांनी सांगितले की, भिंत कोसळलेले ठिकाण जुने
मंदिर आणि त्याच्या शेजारील झोपडपट्टी परिसर आहे, जिथे भंगार
विक्रेते राहतात. रात्रीच्या मुसळधार पावसामुळे ही भिंत कोसळली. या अपघातानंतर
भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी त्या झोपड्या रिकाम्या करण्यात आल्या आहेत.
प्रारंभी ही इमारत कोसळल्याची घटना असल्याचे वाटले, मात्र
तपासानंतर ती भिंत कोसळल्याची घटना असल्याचे स्पष्ट झाले.