दिल्लीच्या महिपालपूरमध्ये रॅडिसन हॉटेलजवळ मोठा आवाज; पोलिसांचा खुलासा — स्फोट नव्हे, बसचा टायर फुटला

दिल्ली - राजधानी दिल्लीच्या महिपालपूर परिसरात आज (गुरुवार, 13 नोव्हेंबर) सकाळी रॅडिसन हॉटेलच्या जवळ मोठ्या स्फोटासारखा आवाज ऐकू आल्याने परिसरात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सकाळी 9:18 वाजता अग्निशमन दलाला या घटनेची माहिती देण्यात आली. काही वेळातच तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, तपासानंतर दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले की, हा कोणताही स्फोट नव्हता. प्रत्यक्षात, धौळा कुआं दिशेने जाणाऱ्या एका डीटीसी बसचा मागील टायर फुटल्याने हा मोठा आवाज झाला होता. तपासादरम्यान घटनास्थळी कोणतेही विस्फोटक साहित्य किंवा संशयास्पद वस्तू सापडल्या नाहीत. डीसीपी साउथ वेस्ट यांनी सांगितले की, “गुरुग्रामकडे जात असलेल्या एका नागरिकाने स्फोटाचा आवाज ऐकल्यानंतर पोलिसांना पहिला कॉल केला होता. तपासात उघड झाले की हा आवाज बसचा टायर फुटल्याने झाला.” दरम्यान, 10 नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर दिल्लीमध्ये सुरक्षा कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व चौक, हॉटेल परिसर आणि संवेदनशील ठिकाणांवर तपासणी सुरू केली असून सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत.