दिल्ली गुन्हे शाखेची मोठी कारवाई; आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी रॅकेटचा पर्दाफाश, चार जण अटक

दिल्ली – दिल्ली गुन्हे शाखेने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी जोडलेल्या आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अजय, मनदीप, दलविंदर आणि रोहन या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही टोळी पाकिस्तानमार्गे तुर्की आणि चीनमध्ये बनवलेल्या अत्याधुनिक परदेशी पिस्तुलांची तस्करी भारतात करीत होती. पोलिसांच्या माहितीनुसार, ही शस्त्रे पाकिस्तानातून ड्रोनद्वारे पंजाबमध्ये सोडली जात आणि त्यानंतर विविध मार्गांनी दिल्ली व आसपासच्या प्रदेशांतील गुंडांना पुरवण्यात येत होती. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून १० महागडी परदेशी पिस्तुले आणि ९२ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जप्त शस्त्रांवरून या रॅकेटची क्षमता आणि तांत्रिक प्रगतता स्पष्ट होते.

कुख्यात गुंडांना शस्त्रे पुरवण्याचा कट

या नेटवर्कचा मुख्य उद्देश लॉरेन्स बिश्नोई, बंबीहा, गोगी आणि हिमांशू भाऊ सारख्या कुख्यात टोळ्यांना ही शस्त्रे पुरवणे हा होता. त्यामुळे दिल्ली आणि NCR मधील कायदा व सुव्यवस्थेविषयी गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोघे पंजाबमधील असून, या नेटवर्कचा पंजाब- पाकिस्तान मार्गे पुरवठा जोड असल्याचे दिसून आले आहे. संपूर्ण जाळे आयएसआयशी संबंधित व्यक्तींच्या निर्देशानुसार चालत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

तपास अधिक गडद

शस्त्रांची वाहतूक पाकिस्तानातून भारतात नियमीतपणे होत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तपास यंत्रणा आता –

  • मोबाइल फोन डेटा
  • बँक व्यवहार
  • सोशल मीडिया खाते
    यांचे विश्लेषण करत आहेत, जेणेकरून आणखी किती शस्त्रे भारतात आली आणि कोणत्या गुंडांपर्यंत पोहोचली याचा तपास करता येईल.