दादर कबुतरखाना वाद चिघळला; जैन समाजाने ताडपत्री फाडून आत प्रवेश केला .

दादर कबुतरखान्यावरून सुरू असलेला वाद बुधवारी सकाळी चिघळला. सकाळी १० वाजेच्या सुमारास जैन समाजाचे कार्यकर्ते कबुतरखान्याजवळ जमले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, ताडपत्री फाडली आणि बांबू काढून कबुतरखान्याच्या आत प्रवेश केला.

पोलीसांनी जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला असून यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

याआधी मंगळवारी मुख्यमंत्री आणि जैन समाजातील प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली होती. याच वादावर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आंदोलन पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, निर्णयाआधीच जमाव एकत्र झाला. महापालिकेने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने कबुतरखाना झाकण्यासाठी तात्पुरती ताडपत्री लावली होती. याच विरोधात जैन समाज आंदोलन करत आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून परिसर सील करण्यात आला आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे.